हुलजंती येथे गुरू-शिष्य पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा
By Admin | Published: October 31, 2016 05:13 AM2016-10-31T05:13:54+5:302016-10-31T05:13:54+5:30
महालिंगराया... बिरोबाच्या नावानं चांगभलं! अशा जयघोषात हुलजंतीमध्ये महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्य भेटीचा नयनरम्य सोहळा रविवारी लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडला.
मंगळवेढा (सोलापूर) : महालिंगराया... बिरोबाच्या नावानं चांगभलं! अशा जयघोषात हुलजंतीमध्ये महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्य भेटीचा नयनरम्य सोहळा रविवारी लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडला.
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती हे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील धनगर समाजाचे आराध्य दैवत आहे. गुरु-शिष्य भेटीचा हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दोन दिवसांपासूनच येथे दाखल झाले आहेत. रविवारी झालेल्या भेटीप्रसंगी जवळपास अडीच लाख भाविकांनी हजेरी लावली.
भेटीच्या सुरूवातीला पौट रस्त्यालगत असणाऱ्या बिरोबा मंदिरापासून दुपारी अडीचच्या सुमारास कार्यक्रमाला सुरूवात झाली. शिरढोणचा बिरोबा शिलवंती, उटगीचा ब्रह्मलिंगदेव, सोन्याळचा पांडुरंग-विठ्ठल, जीर अंकलगीचा बुळाप्पाराया या पालख्या हुलजंती येथील वेशीतून वाजत गाजत भंडारा उधळत भेटीसाठी महालिंगराया मंदिरामागील ओढ्यात आल्या़ यावेळी प्रत्येक पालखीसोबत बैलाच्या पाठीवर नगारा बांधण्यात आला होता. ढोल आणि नगाऱ्याने आसमंत दणाणून जात असताना महालिंगरायाच्या मंदिरातून महालिंगरायाची पालखी या ओढ्यात येऊन थांबली़ आणि प्रत्येक पालखीची महालिंगरायाची भेट घडवून आणली. या भेटीप्रसंगी लाखो भाविक पालखीवर खोबरे, लोकर व भंडाऱ्याची उधळण करत होते़ सायंकाळी चारला हुन्नूरचा बिरोबा व हुलजंतीचा महालिंगराया या गुरु-शिष्यांची पालखी भेट झाली़ तेव्हा भाविकांनी चांगभलंच्या गजरात भंडाऱ्याची एकच उधळण केल्याने परिसराला सोनेरी झळाळी आली होती.
ज्वारी, हरभरा, गहू या पिकाला महत्त्व राहणार आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा करावी लागणाऱ अपघाताचे प्रमाण वाढणाऱ रोगराई, अनेक घातपाताचा काळ ठरणारे वर्ष राहील़ गावपातळी ते महाराष्ट्रात असणाऱ्या पुढाऱ्यांचे राजकीय भविष्य शेतकऱ्यांच्या जीवावर अवलंबून राहणार आहे. बैल, शेळी, मेंढी या जनावरांना सोन्याचा भाव मिळणाऱ पौर्णिमेपर्यंत पाऊस पडेल, अशी भाकणूक पुजाऱ्यांनी भाकणूक कट्ट्यावर सांगितली.