मानवी हक्क आयोगाने दिले भरपाईचे आदेश
By admin | Published: January 20, 2017 12:57 AM2017-01-20T00:57:26+5:302017-01-20T00:57:26+5:30
नातेवाइकांना न कळविता तरुणाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेने राज्य मानवाधिकार संघटनेकडे धाव घेतली.
पिंपरी : नातेवाइकांना न कळविता तरुणाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेने राज्य मानवाधिकार संघटनेकडे धाव घेतली.
याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. त्यांच्यावर संबंधित खात्याने कारवाई केली. राज्याच्या गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, तसेच आरोग्य विभागाचे मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांनी एकत्रित अथवा स्वतंत्रपणे मृत मुलाचे वडील सुब्रह्मण्यम स्वामी यांना भरपाई म्हणून १५ लाख रुपये संबंधित खात्यामार्फत द्यावेत, अशी शिफारस राज्य मानवाधिकार आयोगाने केली आहे.
राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य एम. ए. सय्यद यांनी २८ नोव्हेंबर २०१७ ला दिलेल्या आदेशात मृत मुलाच्या वडिलांना १३ लाख रुपये द्यावेत, अशी शिफारस केली आहे. त्यासाठी या आदेशाच्या दिनांकापासून सहा आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत भरपाईची रक्कम न दिल्यास दरसाल दरशेकडा १२.५० टक्के दराने व्याजासह रक्कम द्यावी, असेही त्यात नमूद केले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, देहूरोड येथील कन्हैया ऊर्फ सूर्या या महाविद्यालयीन तरुणाच्या मृतदेहाची पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मदतीने परस्पर विल्हेवाट लावली. १ आॅक्टोबर २०१० ला देहूरोड येथे राहणाऱ्या कन्हैया या तरुणाचा मृतदेह तळेगावातील आंबी नदीपात्रात आढळून आला. मृतदेह सडलेला असल्याने त्याची विल्हेवाट लावली, असे तळेगाव दाभाडे पोलिसांनी कन्हैयाच्या नातेवाइकांना कळविले. मात्र, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याने नातेवाइकांचा संशय बळावला. कन्हैयाच्या वडिलांनी याप्रकरणी पाठपुरावा केला. तहसीलदारांना विनंती करून कन्हैयाचा मृतदेह उकरून काढण्यात आला. तो विच्छेदनासाठी पुन्हा ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. त्या वेळी डोक्यास मार लागल्याने मृत्यू झाल्याचे कारण पुढे आले. परंतु तळेगाव दाभाडे येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी माधव अडेलू वाघमारे यांनी पाण्यात बडून मृत्यू झाल्याचे कारण दिले होते. ही विसंगती लक्षात आली.(प्रतिनिधी)
>तळेगाव दाभाडे येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी माधव अडेलू वाघमारे यांनी पाण्यात बडून मृत्यू झाल्याचे कारण दिले होते. ही विसंगती लक्षात आली. शिवाय पोलिसांना कन्हैयाच्या खिशात मोबाइल मिळाला असताना, त्यांनी ओळख पटविण्यासाठी वेळीच नातेवाइकांना बोलावले नव्हते. पोलीस अधिकारी महादेव मोरे यांचीही कार्यपद्धती संशयास्पद वाटली. त्यांच्याबद्दल तक्रार दिल्यानंतर कारवाई झाली. दरम्यान, मोरे यांचे १९ जानेवारी २०१४ ला निधन झाले.