मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, चावा घेतल्याचा गुन्हा अदखलपात्रच, न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 06:06 IST2025-04-12T06:05:36+5:302025-04-12T06:06:35+5:30
Court News: चावा घेतल्यानंतर दखलपात्र गुन्हा नोंदवता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. यामुळे मानवी दातांनी चावणे अदखलपात्र गुन्हा ठरणार आहे.

मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, चावा घेतल्याचा गुन्हा अदखलपात्रच, न्यायालय
- डॉ. खुशालचंद बाहेती
छत्रपती संभाजीनगर - चावा घेतल्यानंतर दखलपात्र गुन्हा नोंदवता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. यामुळे मानवी दातांनी चावणे अदखलपात्र गुन्हा ठरणार आहे.
व्यवसायाने वकील असणाऱ्या तानाजी सोलनकर आणि माया सोलनकर यांच्यात मालमत्तेचा वाद होता. यावरून त्यांच्यात भांडण झाले. माया यांनी आरोप केला की, वकील सोलनकर यांनी माया आणि तिचा भाऊ लक्ष्मण यांच्या हाताला चावा घेतला आणि त्यामुळे त्यांना दुखापत झाली.
निवाड्याचे दिले संदर्भ
तानाजी सोलनकर व इतरांच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३२४ (धोकादायक शस्त्रांनी दुखापत), ३२३ (दुखापत), ५०४ (शिवीगाळ), ५०६ (धमकी) अंतर्गत उमरगा पोलिस स्टेशन येथे २६ एप्रिल २०२० रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता.
तानाजी सोलनकर यांनी न्यायालयात एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. न्यायालयाने शकील अहमद विरुद्ध दिल्ली राज्य (२००४) या खटल्याचा आधार घेतला.
न्यायाधीश विभा कंकणवाडी आणि संजय ए. देशमुख यांच्या खंडपीठाने म्हटले की, मानवी दातांनी चावून दुखापत करणे हे कलम ३२४ भारतीय दंड संहिता, (११८(१) भारतीय न्याय संहिता) ऐवजी कलम ३२३ भारतीय दंड संहिता अंतर्गत स्वेच्छेने दुखापत करण्याचा गुन्हा आहे.