प्रासंगिक : मनुष्य गौरव दिन : रचिले तुम्ही मानवतेच्या कल्याणाचे लेणे..! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 08:17 PM2019-10-19T20:17:27+5:302019-10-19T20:30:39+5:30

परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले जन्मशताब्दी वर्ष विशेष -

humanity development in the world by Pandurangshastri Athvale | प्रासंगिक : मनुष्य गौरव दिन : रचिले तुम्ही मानवतेच्या कल्याणाचे लेणे..! 

प्रासंगिक : मनुष्य गौरव दिन : रचिले तुम्ही मानवतेच्या कल्याणाचे लेणे..! 

googlenewsNext
ठळक मुद्दे व्याकरण, न्याय, दर्शनशास्त्रांचा खूप कमी कालावधीत अभ्यास केला पूर्ण ज्ञान, भाव आणि कृतिप्रवणता याचा त्रिवेणी संगम दादांच्या जीवनातप्रभूचे विचार, प्रभुदत्त वित्त आणि प्रभुदत्त माणूस घेऊन दादांनी कामाला सुरवात

'' स्वाध्याय '' परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले अर्थात 'पूजनीय दादा' यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० सालचा. पूजनीय दादांचा जन्मच मुळात वैश्विक आवश्यकताच. जेव्हा समाजात संस्कृती, नैतिक मूल्यांचा ऱ्हास होतो, तत्त्वज्ञानी लोक अकर्मण्य होतात, धर्म आंधळा आणि भक्ती पांगळी होते. अशावेळी धर्मस्थापनेची वैश्विक आवश्यकता निर्माण होते. दादांसारखे महापुरूष येतात तेव्हा त्यांच्याकडे मानवाच्या विकासाची स्पष्ट कल्पना असते. लहापणापासूनच दादांनी संस्कृतीचा जीर्णोद्धार, मानवाचा गौरव आणि समाजाच्या विकासाचा विचार सुरू केला. स्वाध्याय परिवारातून विविध प्रयोग करत या विचाराला त्यांनी मूर्त रूप दिले. अशा दादांचे १९ ऑक्टोबरपासून 'जन्म शताब्दी वर्ष' सुरू होत आहे.
पांडुरंगशास्त्री आठवले यांचे शिक्षण तपोवन पद्धतीने झाले. त्यांनी व्याकरण, न्याय, दर्शनशास्त्रांचा खूप कमी कालावधीत अभ्यास पूर्ण केला. रामायण, महाभारत, वेद, उपनिषद सर्वच प्राचीन भारतीय वाङ्मयाचा अभ्यास केला. त्यानंतर मुंबईतील रॉयल एशियाटिक लायब्ररीमध्ये नवल कथांचा भाग वगळता इतर सर्व पुस्तकांचा अभ्यास केला. विश्वभरातील तत्त्वचिंतकाच्या लिखाणाचा अगदी बारकाईने अभ्यास केला. दादांची स्मरणशक्ती म्हणजे फोटोग्राफिक. एकदा वाचलेले त्यांच्या कायम लक्षात राहत. म्हणून दादा म्हणजे जीवंत ज्ञानकोषच.


विसाव्या शतकातील भक्ती ही शक्ती आहे, या विचाराचा सक्रिय आणि सफल पुरस्कर्ता  दादा आहेत. शास्त्रीय भक्तीतून मानवातील चैतन्य जागृत करण्यासाठी आणि मानवाला गौरव प्राप्त करण्यासाठी आणि मानवातील दीनता आणि हीनता काढण्यासाठी वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी मानवतेचा निर्घोष केला. रशियाने भितीतून व अमेरिकेने भोगातून 'राष्ट्र' निर्माण केले. परंतु, पूजनीय दादांनी भारतात भक्तीतून राष्ट्रनिर्माण करण्याचा संकल्प केला. जपानमध्ये १९५४ मध्ये झालेल्या विश्वतत्त्वज्ञान परिषदेत दादांनी संपूर्ण आशिया खंडाचे नेतृत्व केले. जगातील सर्व तत्त्वचिंतकासमोर भारतीय संस्कृती व भगवान श्रीकृष्णाचे विचार मांडले. अवतारवाद विषयावर बोलताना सिद्ध केले की, अर्थकारण, राजकारण, शिक्षण, समाज, तत्त्वज्ञान, आधात्म यासारख्या विविध क्षेत्रात श्रीकृष्णाचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे. दादांचे हे विचार ऐकून प्रभावित झालेल्या अमेरिकेतील ह्यूमन अप्लिफ्मेंट सोसायटी या संस्थेचे डॉ. कॉम्टन यांनी दादांना अमेरिकेत राहून कार्य व विचार मांडण्याचा आग्रह धरला. याबद्दल्यात दादांना सर्व सुखीसोयी व वित्त देऊ केले. परंतु दादांनी त्यांना नम्रपणे व निष्ठापूर्वक नकार दिला. मला माझ्या देशात राहूनच नि:स्वार्थपणे हे कार्य सुरू करायचे आहे, असे सांगितले. तेजस्वी जीवनसत्त्व व प्रभावी विचारबळावर दादा ६० वर्षे सातत्याने बोलत आणि कार्य करत राहिले. विद्वान पंडित लोकाभिमुख असू शकतात याचा अनुभव म्हणजे दादा. ज्ञान, भाव आणि कृतिप्रवणता याचा त्रिवेणी संगम दादांच्या जीवनात दिसतो.
विश्वात सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृती उभी करण्यासाठी आपल्या ऋषिमुनींनी जीवनाचे हवन केले. ज्या संस्कृतीने हजारो वर्षांपर्यंत आखिल मानवजातीला मार्गदर्शन केले, त्या संस्कृतीविषयी विचारही करण्यास आज कोणी तयार नाही. ह्या भारतीय संस्कृतीची ही घोर विटंबना पाहून दादा व्यथित झाले. समाजातील लाचारी, असंस्कृतपणा, अस्पृश्यता पाहून दादांच्या मस्तकात तिडीक उठली. मुळात अस्पृश्यता हा शब्दच दादांना मान्य नव्हता. माणूस अशिक्षित, असंस्कृत असू शकतो, परंतु माणूस अस्पृश्य कसा असू शकेल? माणूस दुसऱ्याला हलका का लेखतो? दादांच्या मनात या विविध वैश्विक समस्यांचे मंथन चालायचे. या चिंतनातूनच त्यांनी मुंबईतील श्रीमद्भगवद्गीता  पाठशाळेतून कर्मयोगाला प्रारंभ केला. आणि अव्याहतपणे वयाच्या ८३ वर्षांपर्यंत हे कार्य स्वत: केले आणि लाखो लोकांना या कायार्साठी कृतिशील बनवले. पूजनीय दादांनी अविश्रांत कार्य केले. जन्मभूमी रोह्यापासून सुरू केलेले काम विश्वभरात जाऊन पोहचले.
पूजनीय दादांची कार्यपद्धती विश्वात अद्वितीय अशी आहे. जगातील कोणतेही कार्य हे विचार, व्यक्ती आणि वित्तावर आधारित असते. प्रभूचे विचार, प्रभुदत्त वित्त आणि प्रभुदत्त माणूस घेऊन दादांनी कामाला सुरवात केली. ज्ञान, कर्म आणि भक्तीच्या आधारावर कार्य उभे केले. दादांचे अयाचक व्रत हे जगातील आठवे आश्चर्यच म्हणावे लागेल. त्यांनी का कायार्साठी कधीही कुणाकडेही वर्गणी किंवा देणगी मागितली नाही. कोणाचीही प्रतिभा किंवा प्रभाव या कायार्साठी वापरला नाही. भगवंताला या कार्याच्या केंद्रस्थानी मानले. या देशात वेद, उपनिषद, गीतेसारखे तत्त्वज्ञान असताना या भूमीतील माणसे रडकी का? या व्यथेतून निस्वार्थ आणि निस्पृह भावनेतून पूजनीय दादांनी सुरू केलेले कार्य आज विश्वव्यापक बनले आहे. दादांची सुपुत्री आदरणीय सौ. धनश्री श्रीनिवास तळवलकर यांच्या मार्गदर्शनात हे कार्य अविरतपणे सुरू आहे. सागरी, आगरी, वागरी, वनवासी, भुमिपुत्र अशा सर्वच ठिकाणी दादा प्रेम आणि विचार घेऊन पोहचले. माणसातील माणूसपण जागृत केले. माणसातील भगवंताची आठवण करून देत त्याचा गौरव वाढवला. माणसाच्या गौरवासाठी पूजनीय दादांनी अंतिम श्वासापर्यंत कार्य केले. दादांचा जन्मदिन ' मनुष्य गौरव दिन' बनला. यावर्षी दादांचे हे जन्म शताब्दी वर्ष सुरू होत आहे. 'मनुष्य गौरव दिन' जगातील २७ देशात उत्साहात साजरा करण्यात येतो मानवतेचे जीर्णोद्धारक दादांना यानिमित्ताने शतश: वंदन!
.. रचिले तुम्ही मानवतेच्या कल्याणाचे लेणे..! 

Web Title: humanity development in the world by Pandurangshastri Athvale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.