चंद्रपुरात पुन्हा शेकडो काडतुसे सापडली
By admin | Published: June 25, 2014 01:19 AM2014-06-25T01:19:09+5:302014-06-25T01:19:09+5:30
येथील रामाळा तलावाजवळील रेल्वे क्रॉसिंगलगतच्या नाल्यात मंगळवारी राबविण्यात आलेल्या ‘सर्च आॅपरेशन’ मध्ये पुन्हा शेकडो जिवंत काडतुसे सापडलीत. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांची शोधमोहिम सुरूच होती.
शोधमोहीम सुरूच : आरोपीचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे आव्हान
चंद्रपूर : येथील रामाळा तलावाजवळील रेल्वे क्रॉसिंगलगतच्या नाल्यात मंगळवारी राबविण्यात आलेल्या ‘सर्च आॅपरेशन’ मध्ये पुन्हा शेकडो जिवंत काडतुसे सापडलीत. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांची शोधमोहिम सुरूच होती.
या नाल्यात सोमवारी १४९ काडतुसे सापडली होती. त्यामुळे पोलिसांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने मंगळवारी दिवसभर या नाल्यात शोधमोहिम राबविली. तेव्हा दुसऱ्या दिवशीही शेकडो काडतुसे पोलिसांच्या हाती लागली. सायंकाळपर्यंत या काडतुसांचे मोजमाप करण्यात न आल्याने त्याची नेमकी संख्या किती, हे कळू शकले नाही. ही सर्व काडतुसे जिवंत असल्याचे रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद गिरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यापूर्वी चंद्रपुरात तीनवेळा काडतुसे सापडली होती. विशेष म्हणजे रामाळा तलावात व अवतीभोवती ही काडतुसे मिळाली. ती नेमकी कुणी टाकली, याचा अद्यापही पोलिसांना शोध लागला नसताना सोमवारी पुन्हा रामाळा तलावाच्या बाजूलाच असलेल्या नाल्यात काडतुसे सापडल्याने पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून गुन्हेगारांनी भीतीपोटी या नाल्यात काडतुसे फेकून दिली असावी, असा अंदाज ठाणेदार गिरी यांनी व्यक्त केला. या प्रकरणाचा तपास अतिशय गांभीर्याने केला जात असून आरोपीचा माग काढण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)