‘गोकुळ’मध्ये दीडशे कोटींचा ढपला !
By Admin | Published: April 10, 2015 01:07 AM2015-04-10T01:07:55+5:302015-04-10T01:09:50+5:30
लेखापरीक्षणात ताशेरे : महाडिकांचा हलगी वाजवून दरोडा; सतेज पाटील यांचा आरोप
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (गोकुळ) केवळ एका वर्षात तब्बल सुमारे दीडशे कोटींचा हलगी वाजवून दरोडा टाकला आहे. महाडिकांचे टँकर थेट दूध भरून जातात. यामुळे अन्य टँकरच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत, असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. संघाचे विशेष लेखापरीक्षक किरण पाटील यांनी केलेल्या विशेष लेखापरीक्षण अहवालात ओढलेल्या ताशेऱ्यांतील माहिती पाटील यांनी कागदोपत्री पुराव्यांसह यावेळी जाहीर केली.पाटील म्हणाले, ‘सन २०१२-१३ च्या ‘गोकुळ’च्या लेखापरीक्षण अहवालात गैरव्यवहार, उधळपट्टी, अवास्तव खर्च यांवर ताशेरे ओढले आहेत. बल्क कलर्सच्या खरेदीत २०१२ ते २०१४ अखेर सत्ताधाऱ्यांनी संघाचे २२ कोटी २९ लाख ३९४ रुपये नुकसान केले आहे. मुख्यालयातील स्कॉर्पिओ, वेरणा, कॅप्टिव्हा, क्रूझ या गाड्यांच्या चालकांचा पगार, भत्ता, डिझेल, आॅईल, वाहन दुरुस्ती, टायर-ट्यूब, वाहन टॅक्स, विमा, झीज यावर २०१२-१३ मध्ये एकूण ३ कोटी ६८ लाख ६२ हजार ५५४ इतका खर्च केला आहे. संघाच्या मालकीची १२ वाहने संचालक मंडळातील प्रत्येक संचालकास १५ दिवसांकरिता दिली जातात. ही वाहने कोठे फिरविली याच्या नोंदी नाहीत. मुंबई-पुणे मार्गावर दूध वाहतुकीसाठी ८४ टँकर आहेत. यातील संघाच्या मालकीचे पाच आणि खासगी ७९ आहेत. खासगी टँकर्स घेताना निविदा काढल्या जात नाहीत. वाहतुकीचा ठेका जाणीवपूर्वक, ठरावीक लोकांनाच दिला जातो. प्रत्यक्षात कऱ्हाडहून वाहतूक केली असताना कोल्हापूरचे अंतर दाखवून टँकर वाहतुकीचे किलोमीटरचे बिल काढले आहे. महालक्ष्मी पशुखाद्य प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी वाहनतळ करण्यासाठी २ लाख ५० हजार रुपये बोर्डात मंजुरी दिली होती. मात्र प्रत्यक्षात २२ लाख ७९ हजार ५१८ रुपये खर्च दाखविले आहे. संघाचा पशुखाद्य कारखाना आहे. तरीही बाहेरून पशुखाद्य घेतले जाते. यामुळे संघास तीन वर्षांत २ कोटी ६ लाख ३९ हजार तूट आली आहे. गेल्या वर्षी २२ हजार ७२२ बारदान शिल्लक होते. तरीही २४ लाख ५१ हजार ८०८ बारदान खरेदी केली आहे. यामुळे संघाचे पैसे विनाकारण गुंतून पडले आहेत. याचे गौडबंगाल काय ?
मुंबईत दूध विक्री वाढविण्यासाठी बस व फ्लेक्स यांवर जाहिरात केली आहे. जाहिरातीवर वर्षात एक कोटी ९० लाख रुपये खर्च झाले आहेत. किती बसवर जाहिरात केली, किती ठिकाणी फ्लेक्स लावले याचा तपशील नाही. भविष्यकल्याण निधीचे १५ कोटी जमा झाले होते. त्यापैकी १४ कोटी खर्च केले आहेत. अनधिकृत खर्च म्हणून १६ कोटी ४२ लाख रुपये ताळेबंद पत्रकात दाखविले आहे. हा खर्च नेमका काय आहे, हे सांगितलेले नाही. सेल्सटॅक्स रिकरिंग ठेव १२ कोटीही खर्च केली आहे. या सगळ््या गोष्टींचा विचार केल्यास सत्तारुढ मंडळींनी एकत्रित दीडशे कोटींचा ढपला पाडल्याचे दिसत आहे.
चुयेकर यांच्याबाबत
श्रीमती जयश्री पाटील यांची सत्तारुढ आघाडीकडून उमेदवारी निश्चित झाल्यावर त्यांचा मुलगा शशीकांत हा माझ्याकडे आला होता. त्याची आमच्या पॅनेलमधून निवडणूक लढविण्याचीही तयारी होती. परंतू स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्याबद्दल आमच्या मनात कृतज्ञता आहे. त्यांच्यामुळेच हा संघ नावारुपास आला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात राजकारणामुळे भांडणे लागू नयेत यासाठीच शशीकांत यांना उमेदवारी देण्यास नकार दिल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांना चारशे रुपयांचे बूट दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात बुटाची किंमत साडेसातशे रुपये दाखविली आहे. यावरून पैसे कशाकशामध्ये काढले आहेत, हे स्पष्ट होते, असेही पाटील यांनी सांगितले.
कंपनी कोणाची?
दूधविक्रीवर प्रतिलिटर ३ रुपये कमिशन आहे. निम्म्या मुंबईला दूधविक्रीचा ठेका कोल्हापूर आइस अॅँड कोल्ड स्टोअरेज कंपनीकडे आहे. ही कंपनी कोणाची आहे, त्याचे नांव जाहीर करावे, असे आव्हानही पाटील यांनी दिले.
अमल आणि रामराजे संचालक
संघाच्या निवडणुकीत मी विरोधात पॅनेल केल्यामुळे महाडिक आणि कंपनीच्या मनमानीला काही प्रमाणात चाप बसला. पॅनेल केले नसते तर अमल महाडिक आणि रामराजे कुपेकर संचालक मंडळात दिसले असते. ‘गोकुळ’मध्ये पैसे आहेत म्हणूनच दुपारी न झोपता त्यांनी संघात लक्ष घातले आहे. अशाच पद्धतीने कारभार राहिल्यास ‘गोकुळ’ दहा वर्षांत बंद पडेल, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
मुश्रीफांनी याच निवडणुकीत पैरा फेडावा
विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना मदत केल्यामुळेच ते कागल मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी गोकुळच्या याच निवडणुकीत या मदतीचा पैरा फेडावा, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.
‘गोकुळ’मधील भविष्यकल्याण निधीचा गैरवापर : सतेज पाटील
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात १५ कोटी ६८ लाख ४५ हजार ८०६ इतक्या भविष्यकल्याण निधीपैकी १४ कोटी १८ लाख ४५ हजार ८०६ इतक्या रकमेचा गैरवापर केल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, संस्थेची स्वत:ची लोणी गोडावून आहेत; परंतु, त्यांच्या क्षमतेचा वापर न करता बाहेरील गोडावूनचा वापर केला जात आहे. संस्थेची गोडावून असताना कमिशनसाठी बाहेरील गोडावूनवर खर्च करून उत्पादकांचे नुकसान केले जात आहे. संघाचे गडमुडशिंगी येथे १०० मेट्रिक टन व कागल, हातकणंगले औद्योगिक वसाहतीत ३०० मेट्रिक टन क्षमतेचा पशुखाद्य निर्मितीचा कारखाना आहे. तरीही कमिशनसाठी बाहेरून पशुखाद्य घेतले जाते. २ लाख ३५ हजार १८३ गाय व म्हैस यांना कृत्रिम रेतन दिल्याची नोंद आहे. यातील फक्त ६७ हजार ८९९ यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. यशस्वितेचे प्रमाण फक्त २८ टक्के आहे. याचा अर्थ ७२ टक्के म्हणजेच १ लाख ६७ हजार २८४ रेतन अयशस्वी झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पारदर्शक आणि काटकसर करून कारभार केल्यास उत्पादकांना लिटरमागे दोन रुपये अधिक देणे शक्य आहे.
सतेज म्हणतात, असा झाला गैरव्यवहार
उत्पादक भविष्य कल्याणनिधी - १४ कोटी १८ लाख ४५ हजार ८०६
लोणी गोडाऊन भाडे - १ कोटी ४५ लाख ९५ हजार १३९
जाहिरात खर्च - १ कोटी ३७ लाख ४ हजार १०७
डिफरल ठेव - १२ कोटी
राखीव निधी - १७ कोटी ६४ लाख ५८ हजार ८१
अनधिकृत निधी - १६ कोटी ४२ लाख ३० हजार
कमी दराने माल विक्री -
११ कोटी ११ लाख २९६
बल्क कुलर खरेदी -
७६ लाख ९७ हजार ६४
पशुखाद्य कारखाना
उभारणीस अनावश्यक खर्च -
२२ कोटी ६२ लाख
पॉवर प्लँट रिन्युएशन खर्च
- ५ कोटी १७ लाख
कृत्रिम रेतन - २६ कोटी ३४ लाख
अॅटोमेटिक कलेक्शन
मशीन - १६ कोटी ३१ लाख