धान्यांच्या शेकडो पोत्यांचा काळाबाजार
By admin | Published: June 8, 2016 08:11 PM2016-06-08T20:11:20+5:302016-06-08T20:11:20+5:30
मोरगाव भागातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दुकानदार स्वत:चे उखळ पांढरे करून घेत आहेत. दुकानांना धान्य कोटा मिळाल्यानंतर महिनाभर धान्य देण्याची सक्ती असूनही ह्यवाटप मुदत संपली
स्वस्त धान्य दुकान : दुाकानदारांचे उखळ पांढरे
पुणे : मोरगाव भागातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दुकानदार स्वत:चे उखळ पांढरे करून घेत आहेत. दुकानांना धान्य कोटा मिळाल्यानंतर महिनाभर धान्य देण्याची सक्ती असूनही ह्यवाटप मुदत संपली या नावाखाली शेकडो पोत्यांचा काळाबाजार येथे होत आहे.
स्वस्त धान्य दुकानांमधून राष्ट्रीय अन्न व सुरक्षा कायद्यानुसार अल्प दरात, भूमिहीन, दारिद्य्ररेषेखालील बीपीएल धारकांना गहू, तांदूळ, रॉकेल, साखर दिले जाते. मात्र, ज्या उद्देशासाठी नवीन अन्नसुरक्षा कायदा झाला, तो उद्देश बाजूला राहून स्वस्त धान्य दुकाने मलिदा खाण्याची ठिकाणे झाली आहेत.
मोरगाव येथे अधिकृत रेशन कार्डधारकांना रेशनिंग मिळत नाही. बोगस कार्डधारकांना रेशन मिळत असल्याची तक्रार आहे. कोटा आल्यानंतर पोत्यात माल कमी भरला असल्याचे व वरिष्ठांनाही पैसा पुरवावा लागतो, हे कारण देऊन रेशन कमी देऊन शिल्लक माल काळ्याबाजाराने परिसरातील दुकानदारांना विकण्यात येत आहे. महिन्याकाठी हजारोंची माया दुकानदार अशा रीतीने कमवत आहेत. काळ्याबाजारात जाणारा रेशनचा माल मोरगाव येथे सापळा रचून पकडल्याच्या अनेक घटना आहेत. मात्र, तालुक्यातील यामध्ये सापडलेल्या व्यक्तींना लगेच जामीन मिळतो. सर्वसामान्यांच्या पोटचा घास हिरावणाऱ्या या मुजोरांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे, अशी मागणीही रेशनकार्ड धारकांनी केली आहे.
दक्षता समित्या नामधारी
काळाबाजार रेशनिंगमध्ये परिसरातील गावकामगार तलाठ्यांचा सहभाग असल्याने गावोगावच्या दक्षता कमिट्या नामधारी आहेत. यामुळे तहसीलदारांनी लक्ष घालावे, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.