निवडणुकीत कोट्यवधी, मग देश ‘कॅशलेस’ कसा?
By Admin | Published: February 19, 2017 02:21 AM2017-02-19T02:21:53+5:302017-02-19T02:21:53+5:30
आजघडीला भाजपा निवडणुकीत कोट्यवधी रुपये ओतत आहे. मग भारत कॅशलेस कसा? थापा मारण्यासही काही मर्यादा असतात. मागील २५ वर्षांत युती राहून या पक्षांनी काय केले?
मुंबई : आजघडीला भाजपा निवडणुकीत कोट्यवधी रुपये ओतत आहे. मग भारत कॅशलेस कसा? थापा मारण्यासही काही मर्यादा असतात. मागील २५ वर्षांत युती राहून या पक्षांनी काय केले? याबाबत कोणीच काहीच बोलत नाही. आम्ही नाशिकचा विकास केला. मात्र हे लोक विकासावर बोलत नाहीत, असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपासह शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. दादरच्या कबुतरखान्याजवळ सभेत राज ठाकरे यांचे आक्रमक भाषण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे आणि नाशिक येथे सभा झाली. येथील दोन्ही सभांत लोक उपस्थित असले तरी पारदर्शी कारभारामुळे मुख्यमंत्र्यांनी ते दिसले नसतील, असा चिमटा काढत त्यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली.
राज पुढे म्हणाले, २५ वर्षे तुम्ही सत्तेवर आहात. मात्र कोट्यवधी रुपये कुठे गेले? याचे उत्तर तुमच्याकडे नाही. मुंबईसमोर आरोग्याचा प्रश्न उभा आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत सेवा-सुविधा नाहीत; आणि खासगी रुग्णालयांचे मात्र पेव फुटले आहे. खासगी रुग्णालयात पैसे उकळले जातात. मात्र यांना त्याचे काहीच नाही. महापालिकेच्या नोकर भरतीसाठी बाहेरील माणसे येतात. सत्ता शिवसेना-भाजपाची आणि कंत्राटदार मात्र बाहरेचे. नाशिकचा मुद्दा घेत माझ्यावर टीका केली जात. पण महापालिका निवडणूक आणि काद्यांचा भावाचा काय संबंध? कशाचाही संबंध कुठेही जोडला जातो. शिवसेना-भाजपाने आतापर्यंत काहीही केलेले नाही. परिणामी त्यांना होर्डिंग्जची गरज भासत आहे. दोघांचा डोळा महापौरांच्या बंगल्यावर, मुंबईतील जमिनींवर आहे. सगळे मिळवण्यासाठी बाळासाहेबांच्या नावाचा वापर केला जातोय. विकासकांना जागा मिळतात मग स्मारकाला जागा का मिळत नाही? स्मारकच करायचे असेल ना तर नाशिकला या, मी करून दाखवतो स्मारक. तिकडे बेहरामपाड्यात पाच मजली झोपड्या उभ्या राहिल्या. लोक तेथे आता जाऊ शकत नाही. तुम्ही फक्त हिंदुत्त्वाचा मुद्दा घेता मग असे मोहल्ले कसे उभे राहतात. मेट्रोच्या कारशेडसाठी वाद उभा राहतो. मात्र दुसरीकडे जमिनीच्या जमिनी गिळंकृत होत असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
जाहिरांतीवर पैसा ओतला
मुंबईत जाहीरनामे आणणार नाही. कारण हे वेळ दडवण्यासारखे आहे. याबाबत कोणी प्रश्न विचारत नाही मग जाहीरनामा प्रसिद्ध तरी का करायचा. गेल्या दहा दिवसांत भाजपा आणि शिवसेनेच्या वर्तमानपत्रातील जाहिरात बघा. किती पैसा ओतला आहे ते समजेल, असेही ते म्हणाले.