बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींचे घबाड
By Admin | Published: June 15, 2015 05:28 AM2015-06-15T05:28:24+5:302015-06-15T05:28:24+5:30
महाराष्ट्र सदन बांधकामातील कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हे दाखल केलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील सात अधिकाऱ्यांच्या घरी
मुंबई : महाराष्ट्र सदन बांधकामातील कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हे दाखल केलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील सात अधिकाऱ्यांच्या घरी शनिवारी रात्री एसीबीने छापे घातले.
यामध्ये या अधिकाऱ्यांकडे सोने-चांदीसह महागडी वाहने, बँकांमधील लाखो रुपयांची रोकड, एकापेक्षा अधिक घरांची कागदपत्रे आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील काही महत्त्वाची कागदपत्रेदेखील आढळून आली आहेत. राज्यभर टाकलेल्या धाडींमध्ये समोर आलेली कोट्यवधींची संपत्ती पाहून एसीबी अधिकारीही चक्रावून गेले.
महाराष्ट्र सदन बांधकामातील गैरव्यवहार आणि अनियमिततेप्रकरणी चौकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश
उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार एसीबीने गुरुवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ
नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज,
पुतण्या समीर आणि कंत्राटदार मेसर्स चमणकर यांच्यासह एकूण १७ जणांवर गुन्हा दाखल केला. हे गुन्हे दाखल होताच शनिवारी रात्री यातील सात आजी-माजी अधिकाऱ्यांच्या घरावर एसीबीने छापे घातले.