प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत शेकडो रुग्ण
By admin | Published: December 23, 2015 02:05 AM2015-12-23T02:05:47+5:302015-12-23T02:05:47+5:30
सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील किडनी ट्रान्सप्लांट सेंटरला (मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी नसल्याने आरोग्य विभागाने केंद्र सुरू करण्यासाठी
नागपूर : सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील किडनी ट्रान्सप्लांट सेंटरला (मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी नसल्याने आरोग्य विभागाने केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र थांबवून ठेवले होते. गेल्या महिन्यात याला मंजुरी मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले. त्याचे मिनिट्सही आले. या मिनिट्सवर प्रमाणपत्र देण्याचे पत्र मेडिकल प्रशासनाने आरोग्य विभागाला पाठविले. परंतु मिनिट्स नको प्रमाणपत्र हवे, असा हट्ट
आरोग्य विभागाने धरल्याने
किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेले शेकडो रुग्ण अडचणीत आले आहेत.
राज्यात प्रथमच नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपण होणार होते. याची घोषणा २०१४च्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. तीन महिन्यांत हे केंद्र सुरू करा, असे निर्देशही मेडिकल प्रशासनाला दिले होते. सात महिन्यांनंतर अभ्यागत मंडळात हा विषय समोर आला. अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राला घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाला धारेवर धरले.
तीन दिवसांत प्रमाणपत्र देण्याची सूचना केली. परंतु आरोग्य विभागाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी नसल्याचे कारण पुढे करीत प्रमाणपत्र राखून ठेवले. तब्बल तीन महिन्यांनंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या मंडळाने मंजुरी दिल्याचे मिनिट्स मेडिकलला प्राप्त झाले.
सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रशासनाने हे मिनिट्स आणि प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र देण्याचे पत्र आरोग्य विभागाला पाठविले. परंतु आता मिनिट्स नको प्रमाणपत्रच हवे, असे धोरण आरोग्य विभागाने स्वीकारले आहे. (प्रतिनिधी)