हाँगकाँग टूरच्या नावाखाली शेकडो डॉक्टरांना फसवणाऱ्यास अटक
By Admin | Published: May 25, 2017 12:37 AM2017-05-25T00:37:03+5:302017-05-25T00:37:03+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि मालाड मेडिकल असोसिएशन (एमएमए)चे सदस्य असलेल्या आणि
मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि मालाड मेडिकल असोसिएशन (एमएमए)चे सदस्य असलेल्या आणि वैद्यकीय बैठकीसाठी हाँगकाँगला निघालेल्या शेकडो डॉक्टरांची एका टूर आॅपरेटरने फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. या टूरचे आयोजन करणारा आणि फरार असलेला ओपेक्स ट्रॅव्हल्सचा मालक विनायक झारेकर याच्या मुसक्या आवळण्यात बुधवारी दहिसर पोलिसांना यश आले.
मालाड मेडिकल असोसिएशनच्या २५ डॉक्टरांची झारेकर याने फसवणूक केल्यामुळे ही टीम मकाऊमध्ये अडकली आणि त्या ठिकाणीही हॉटेल्सकडून वाईट वागणूक मिळाली. अखेर भारतात परतण्यासाठी त्यांना नातेवाइकांकडून पैसे मागवावे लागले. डॉक्टरांची ही संपूर्ण टीम बुधवारी भारतात परतली. मात्र आयएमएच्या ३९ डॉक्टरांचे पथक अशाच प्रकारे चीनच्या शॉन्झेनमध्ये शनिवारपासून अडकून पडले आहे. या डॉक्टरांच्या मदतीसाठी आयएमएने आर्थिक मदत पाठवली आहे. तिकीट रद्द करणे किंवा मग स्वत:च्या खर्चावर पुढील प्रवास करणे हे दोनच मार्ग या डॉक्टरांकडे शिल्लक आहेत. तथापि, ग्रुप बुकिंग असल्याने झारेकरलाच ती रद्द करण्याचा अधिकार होता. तो मात्र फरार झाला होता. त्यामुळे आता डॉक्टरांना परत बोलविण्यासाठी आयएमएला आर्थिक मदत पाठवावी लागली. या प्रकरणी एमएमएपाठोपाठ आयएमएनेदेखील दहिसर पोलीस ठाण्यात झारेकरविरुद्ध तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर त्याला अटक करून बोरीवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. झारेकरला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती दहिसर पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.