छोट्या पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
By admin | Published: July 15, 2016 03:00 PM2016-07-15T15:00:17+5:302016-07-15T15:29:55+5:30
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील छोट्या पंढरपूरात शुक्रवारी आषाढी एकादशी यात्रे निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली.
ऑनलाइन लोकमत
वाळूज महानगर, दि. १५ - वाळूज औद्योगिक क्षेत्रातील छोट्या पंढरपूरात शुक्रवारी आषाढी एकादशी यात्रे निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली. विठ्ठलाचा जयघोष व टाळ मृदंगाच्या गजरात येणाऱ्या वारकरी दिंड्यामुळे संपूर्ण पंढरपूर भक्तीसागरात न्हाऊन निघाले. यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह अनेक भाविक पंढरपूरात दाखल झाल्याचे दिसून येत होते. यावेळी आलेले भाविक विठ्ठल चरणी लिन होऊन पावसाची अशीच कृपादृष्टी असू दे असे साकडे घालत होते.
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपूरात दरवर्षी मोठी यात्रा भरते जवळपास दरवर्षी ५-६ लाख भाविक विठुमाऊलीच्या दर्शनासाठी येत असतात. शुक्रवार १५जुलै रोजी पंढरपूरात विठ्ठल भक्तांचा जनसागर उसळला आहे. मध्यरात्री १२ वाजुन ५ मिनिटींनी विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आ. अतुल सावे व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली सावे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात येणार आहे. महाभिषेक व उद्योगपती शशीकांत ढमढेरे व त्यांच्या सुविद्य पत्नी मोहिनी ढमढेरे यांच्या हस्ते महाआरती करुन दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. यात्रेनिमित्त येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वाळूज पंचक्रोशीसह औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाना, नगर, श्रीरामपूर आदि भागातून वारकरी दिंड्या व भाविक पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत. लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केल्याने दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेवून विश्वस्त मंडळ व पोलिस प्रशासनाच्यावतीने मंदिर परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. घातपाताच्या शंकेने पोलीस प्रशासनाकडून एक्सपोििजव डिटेक्टर (घातपात तपासणी यंत्र) च्या सहाय्याने परिसराचा आढावा घेतला जात होता. महिला व पुरुष भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाचा सुलभपणे लाभ घेता यावा, यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून दिंडीतील वारकऱ्यांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान पंढरपूरात आलेल्या विठ्ठल भक्तांसाठी मंदिर समिती व विविध सेवाभावी संघटनेच्या वतीने ठिक-ठिकाणी फराळ व चहापान बरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकरी व भाविकांचे लोंढेच्या लोंढे येत असल्याने अवघे पंढरपूर भक्तीसागरात बुडाले आहे.