शिरूर-हवेलीतून नाच-गात देहू-आळंदीकडे निघाले शेकडो वारकरी
By Admin | Published: June 28, 2016 01:37 AM2016-06-28T01:37:01+5:302016-06-28T01:37:01+5:30
पुणे-नगर रस्ता आज भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.
लोणीकंद :
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जिवेभावी ।।
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा।।
पुण्याची गणना कोण करी ।।
पुणे-नगर रस्ता आज भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता. अभंग, गौळणी, भजन गात वारकरी भगव्या पताका खांद्यावर घेऊन महिला भाविक तुळस डोक्यावर घेऊन नाचत- गात आळंदी-देहूकडे वाटचाल करत होते.
शिरूर-हवेली प्रासादिक दिंडीच्या शेकडो वारकऱ्यांनी भीमा नदी ओलांडून हवेली तालुक्यात प्रवेश केला. पेरणे फाटा येथे विसावा घेतला, तर टोलनाका येथे दुपारची विश्रांती घेतली. दिंडीचे अध्यक्ष पोपटराव शिवले, उपाधयक्ष रमेश भंडलकर, दिलीप ढेरंगे, हनुमंत शिवले, बाळासाहेब कंद, मानद सचिव काळूराम गव्हाणे, विवेक ढेरंगे, केशव फडतरे यांनी उत्तम संयोजन केले. सुमारे ५०० स्त्री-पुरुष वारकरी सहभागी झाले होते. पेरणे फाटा येथे अशोक भोंडवे, टोलनाका येथे प्रा. गोरख वाळके, मच्छिंद्र वाळके यांनी अन्नदान केले. सेवादलाचे तालुका अध्यक्ष नारायण फडतरे, बबुशा ढेरंगे यांच्या हस्ते अन्नदात्याचा सत्कार करण्यात आला.
शिरूर हवेली प्रासादिक दिंडी सोहळा सलग ३० वर्षे चालू आहे. दिंडीतील भाविकांचा तंबूमध्ये मुक्काम आणि दोन वेळा भोजनाची व्यवस्था दिंडीतर्फे करण्यात येते. लोणीकंद, वढू खुर्द, कोरेगाव भीमा, वढू बु., आपटी, डिंग्रजवाडी गावातील भाविकभक्त सुमारे एक हजार सहभागी होतात.
‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष करीत गुरुदेव दत्त भजनी मंडळाने आगळीवेगळी शोभा आणली. मंडळाचे हे दुसरे वर्ष असून, २५ महिला भाविकांनी एकाच रंगाची साडी नेसून डोक्यावर तुळस आणि गळ्यामध्ये टाळ, मुखी भगवंताचे नाम या मुळे सर्व सोहळ्यात लक्ष वेधून घेत होते. सुवर्णा ढेरंगे, भाग्यश्री गोसावी, राजश्री गोसावी, मंजुळा गव्हाणे, अश्विनी सव्वासे, भारती फडतरे आदींनी या मंडळाचे सुरेख नियोजन केले.
राजमाता अहिल्याबाई होळकर प्रासादिक दिंडी यांचे पेरणेफाटा येथे आगमन झाले. लोणीकंदचे माजी सरपंच श्रीकांत कंद यंनी वीणापूजन केले. पंढरीनाथ पठारे, सौ. विमल पठारे, उत्तमराव भोंडवे, गजानन कंद आदी उपस्थित होते.
>सकाळी पेरणे गाव (ता. हवेली) येथील विठ्ठल मंदिरात सर्व वारकरी जमले. दिंडीप्रमुख वीणेकरी बबनराव वाळके पाटील यांच्या हस्ते वीणापूजन करून दिंडीने प्रस्थान ठेवले. समारे २०० वारकरी सहभागी झाले होते.यामध्ये पेरणे, बकोरी प्रासादिक दिंडीमधील शेकडो वारकरी उत्साहाने रवाना झाले.संगमेश्वर प्रासादिक दिंडी तुळापूर दिंडीने संगमेश्वर मंदिरामधून हरिनामाच्या गजरात येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. दिंडी अध्यक्ष काळूराम शिवले, उपाध्यक्ष पोपटराव शिवले यांनी पुढाकार घेऊन ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या संगमेश्वर नावाने दिंडी सुरू केली. हे पाचवे वर्ष असून, सुमारे १०० वारकरी सहभागी झाले.