शंभराव्या नाट्यसंमेलनाची यंदा पहिली घंटा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 04:27 AM2018-06-10T04:27:20+5:302018-06-10T04:27:20+5:30

पावणेदोनशे वर्षांच्या परंपरेचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या मराठी रंगभूमीच्या इतिहासात आतापर्यंत तब्बल ९७ अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलने पार पडली आहेत.

hundredth Marathi Natya Sammelan Countdown Will Start | शंभराव्या नाट्यसंमेलनाची यंदा पहिली घंटा...!

शंभराव्या नाट्यसंमेलनाची यंदा पहिली घंटा...!

googlenewsNext

- राज चिंचणकर

पावणेदोनशे वर्षांच्या परंपरेचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या मराठी रंगभूमीच्या इतिहासात आतापर्यंत तब्बल ९७ अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलने पार पडली आहेत. तर यंदा होणारे ९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. येत्या दोन वर्षांत नाट्यसंमेलनाची ही परंपरा शंभरी गाठणार असून, यंदाचे नाट्यसंमेलन ही त्याची पहिली घंटा ठरणार आहे. वर्ष २०१९ मध्ये संमेलनाची दुसरी आणि वर्ष २०२० मध्ये संमेलनाची तिसरी घंटा वाजून पडदा वर गेला की अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे शतक दिमाखात साजरे होईल.
दोन वर्षांनी होणाºया १०० व्या नाट्यसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या यंदा निवडून आलेल्या नव्या कार्यकारिणीसाठी यंदाचे नाट्यसंमेलन म्हणजे पूर्वतयारीचा भाग असेल. या नाट्यसंमेलनाचे शिवधनुष्य ही कार्यकारिणी कसे पेलते, याकडे समस्त नाट्यसृष्टीचे लक्ष लागले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी १०० व्या नाट्यसंमेलनाच्या विषयावर बोलताना, यंदाचे नाट्य संमेलन हे १०० व्या नाट्यसंमेलनाची नांदी आहे, अशी भूमिका मांडली आहे. १०० व्या नाट्यसंमेलनाला सांगलीवरून नाट्य परिषदेची अथवा रंगभूमीची अशी एक मशाल निघेल. या मशालीचा प्रवास हा १०० दिवसांचा असेल. नाट्य परिषदेच्या महाराष्ट्रातील ५० शाखा लक्षात घेतल्या, तर या शाखांवर २-२ दिवस ही मशाल ठेवण्यात येईल. नाट्य परिषदेच्या प्रत्येक शाखेला १०० व्या नाट्यसंमेलनात सामावून घेण्याच्या दृष्टीने आम्ही हा उपक्रम करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

१०० व्या नाट्यसंमेलनात कार्यकर्ता म्हणून काम करायचे आहे!
अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे मावळते अध्यक्ष व बुजुर्ग रंगकर्मी जयंत सावरकर यांच्याशी १०० व्या नाट्यसंमेलनाविषयी संवाद साधण्याचा योग आला. जयंत सावरकर यांनी गेली तब्बल सहा दशके मराठी रंगभूमीची वाटचाल अगदी जवळून पाहिली आहे आणि आज वयाच्या ८३ व्या वर्षीही ते रंगभूमीवर कार्यरत आहेत.
शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाविषयी बोलताना जयंत सावरकर म्हणतात, १०० व्या नाट्यसंमेलनाची मी उत्कंठतेने वाट पाहतोय. मी गेल्या वर्षीच्या, म्हणजे ९७ व्या नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष झालो खरा; परंतु मी १०० व्या नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष झालो असतो तर मला जास्त आनंद झाला असता. आता मी थोडा लवकर जन्माला आलो तर त्याला काय करणार...? १०० व्या संमेलनापर्यंत टिकाव धरून कसे राहता येईल, याचा मी सतत विचार करतोय. पण केवळ टिकाव धरून नाही; तर रंगभूमीवर काम करत राहून मला १०० वे नाट्यसंमेलन पाहायचे आहे. त्या वेळी माझ्या अंगात शक्ती असेल, तर त्या नाट्यसंमेलनासाठी एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे.
नाट्यसंमेलनाचा मी असा एक अध्यक्ष आहे की जेव्हा माझी नाट्यसंमेलनाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली तेव्हा मी नाटकाच्या दौºयावर होतो आणि आता जेव्हा सूत्रे नव्या अध्यक्षांकडे द्यायची वेळ आली; तेव्हासुद्धा मी एका नवीन नाटकाच्या तालमीमध्ये आहे. १०० वे नाट्यसंमेलन तीन दिवस न होता जास्त दिवस व्हावे, अशी माझी इच्छा आहे. हे संमेलन अशा ठिकाणी व्हावे; जेथे महाराष्ट्रातील सगळ्या भागांतून नाट्यरसिक येतील आणि त्यांची उत्तम व्यवस्था करता येईल इतके झकास नियोजन १०० व्या नाट्यसंमेलनाचे असायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 

Web Title: hundredth Marathi Natya Sammelan Countdown Will Start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.