गोव्यात त्रिशंकू विधानसभा शक्य
By admin | Published: February 6, 2017 01:55 AM2017-02-06T01:55:07+5:302017-02-06T01:55:07+5:30
मतदारसंघातील राजकीय वारे आणि मतदानाच्या टक्केवारीचे विश्लेषण करता गोव्यात त्रिशंकू विधानसभेची शक्यता राजकीय अभ्यासकांना वाटते.
पणजी : मतदारसंघातील राजकीय वारे आणि मतदानाच्या टक्केवारीचे विश्लेषण करता गोव्यात त्रिशंकू विधानसभेची शक्यता राजकीय अभ्यासकांना वाटते. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास सरकार स्थापनेसाठी मगोप किंवा अपक्षांचा आधार सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या पक्षांना घ्यावा लागेल. भाजपा, काँग्रेस व ‘आप’ने स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा केला आहे.
उत्स्फूर्त मतदानाचा आपल्यालाच लाभ होईल, असे तिन्ही पक्ष मानतात. मगोपने ८ ते १२ जागा आपल्याला मिळतील, असे सांगितले. भाजपाचे सर्व ३६ उमेदवार तसेच मतदारसंघ मंडल अध्यक्षांची केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर तसेच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी बैठक घेतली. कोअर कमिटीने या सर्वांशी संवाद साधून अहवाल घेतला.
भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास या अहवालाअंती या समितीने काढला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२ जागा मिळतील, असा समितीचा होरा आहे. त्रिशंकू विधानसभेची शक्यता असताना आप वगळता कोणीही आपले धोरण स्पष्ट करायला तयार नाही.
आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही किंवा कोणाकडून घेणारही नाही. त्यापेक्षा विरोधात बसणे
पसंत करू, असे आपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिनेश वाघेला यांनी सांगितले.
भाजपाने ३६ जागा लढविल्या. नावेली व प्रियोळमध्ये अपक्षांना पाठिंबा दिला. काँग्रेसने ३७ जागांवर उमेदवार उभे केले होते. पर्वरी व पणजीत त्यांनी अनुक्रमे अपक्ष रोहन खंवटे व युगोचे बाबूश मोन्सेरात यांना समर्थन दिले. ‘मगोप’, गोवा सुरक्षा मंच व शिवसेना युतीने २४ जागा लढविल्या तर आम आदमी पक्षाने ३९ जागांवर उमेदवार उभे केले होते.
बदलाचे वारे नव्हे - भाजपा
भाजपाच्या मतदान केंद्र व्यवस्थापनामुळेच विक्रमी मतदान झालेले आहे. हे मतदान प्रस्थापितांविरुध्द आहे किंवा बदलाचे वारे आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे मत पक्षनेते सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले.
पैशांचा प्रचंड वापर
- आप
‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एल्वीस गोम्स यांच्या मते ‘सायलंट’ मतदान झालेले असून ते ‘आप’साठी फायदेशीरच आहे. त्रिशंकू विधानसभेची शक्यता त्यांनी फेटाळली. त्याचबरोबर या निवडणुकीत अन्य राजकीय पक्षांनी तसेच अपक्षांनी पैशांचा प्रचंड वापर केला, असा आरोप त्यांनी केला.
मगोपला ८ ते १२ जागा - मामलेदार
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ८ ते १२ जागा मिळतील, असे मगोपचे सरचिटणीस आ. लवू मामलेदार यांनी सांगितले. फोंडा, सावर्डे, मडकई, शिरोडा, प्रियोळ, दाबोळी, डिचोली व पेडणे या आठ जागा तर निश्चितच मिळतील, असे ते म्हणाले.
बहुमत मिळेल - काँग्रेस
त्रिशंकू विधानसभा स्थापन होऊच शकत नाही. आम्हालाच स्पष्ट बहुमत मिळेल. हे बदलासाठीचे मतदान होते. आम्ही ६0 टक्के नवे चेहरे दिले. त्याचा फायदा होईल, असे काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस गिरीश चोडणकर यांनी सांगितले.