जिल्ह्यातील गुन्हेगारीला लागला लगाम
By Admin | Published: July 21, 2016 12:50 AM2016-07-21T00:50:51+5:302016-07-21T00:50:51+5:30
पोलीस मित्रांचा वापर करून रात्रगस्तीत केलेली वाढ, नाकाबंदीचा परिणामकारक वापर
विवेक भुसे,
पुणे- पोलीस मित्रांचा वापर करून रात्रगस्तीत केलेली वाढ, नाकाबंदीचा परिणामकारक वापर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कासारखी कडक कारवाई केल्याने पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीला लगाम बसला आहे़ गेल्या सहा महिन्यांत गतवर्षीच्या तुलनेत प्रमुख गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे़ खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, बलात्कार अशा प्रमुख गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे़
जानेवारी ते जून २०१६ मध्ये पुणे जिल्ह्यात ७२ खुनाचे प्रकार घडले असून, त्यातील ७० गुन्हे उघडकीस आले होते़ याच काळात गतवर्षी २०१५ मध्ये ८२ गुन्हे दाखल असून, त्यांपैकी ७२ गुन्हे उघडकीस आले होते़ या वर्षी जबरी चोरीच्या ६२ घटना असून, त्यापैकी ४१ गुन्हे उघडकीस आले आहेत़ गतवर्षी जबरी चोरीच्या ११५ घटना घडल्या होत्या, त्यांपैकी ५८ गुन्हे उघडकीस आले होते़ अशाच प्रकारे दरोडा, घरफोडी, बलात्कार, विनयभंग अशा प्रमुख गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे़
याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ़ जय जाधव यांनी सांगितले की, ग्रामीण भागात सध्या साडेआठ हजार पोलीसमित्र असून, पोलिसांबरोबर ते रात्री गस्त घालतात़ गेल्या वर्षी ४ आॅगस्ट २०१५ पासून जिल्ह्यात दररोज नाकाबंदी करण्यास सुरुवात केली़ जिल्ह्यात दररोज किमान दोन ठिकाणी नाकाबंदी केली जाते़ याशिवाय आठवड्यातून दोन वेळा आॅलआउट आॅपरेशन राबविले जाते़ त्या वेळी अधीक्षकापासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्व जण रस्त्यावर येतात़ सराईत गुन्हेगारांची तपासणी होती़ याचवेळी जे दिवसा आढळून येत नाही़ अशांना समन्स बजावले जाते़ त्याचा चांगला उपयोग होत आहे़ सासवड, जेजुरी, जुन्नर, मुळशी येथील गुन्हेगारी टोळ्यांवर मोकांतर्गत कारवाई केल्याने गुन्ह्यांवर आळा बसला असल्याचे त्यांनी सांगितले़
>सूडाला आळा घालण्याचा प्रयत्न
खुन, खुनाचा प्रयत्न अशा गुन्ह्यात अनेकदा फिर्यादी अथवा त्यांच्या सहकाऱ्यांकडून सूड म्हणून बदला घेण्याचा प्रयत्न केला जातो़ गेल्या चार वर्षातील अशा गुन्ह्यांमधील फिर्यादी व आरोपी अशा दोघांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात येते़ त्यांच्याकडे काही हत्यार आहे का याची माहिती घेतली जाते़ त्यातून आपल्याकडे पोलिसांचे लक्ष असल्याचे त्यांना जाणवत असल्याने अशा गुन्ह्यांवर वचक बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला़
- डॉ़ जय जाधव, पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दल़
>पोलीस मित्रचा परिणामकारक उपयोग
जिल्ह्यात प्रत्येक बीटला पोलीस मित्र व प्रमुख नागरिकांचा मिळून व्हॉटसअप गु्रप तयार करण्यात आला आहे़ त्यामुळे गावांमध्ये घडत असलेल्या घडामोडींची माहिती पोलिसांना तातडीने मिळत आहे़ त्याचा उपयोग कायदा सुव्यवस्थेसाठी होत आहे़
काही दिवसांपूर्वी माळशेज घाटातून परत येणाऱ्या मोटारीतील लोकांना अडवून त्यांना लुटले व ते मोटारीतून पुण्याकडे निघाले होते़ त्यांच्यातील एकाने आपल्याला मारहाण करुन लुबाडल्याचे व्हाटसअॅपवरील एका ग्रुपवर टाकले होते़ त्या ग्रुपमध्ये एक पोलीस कर्मचारी होता़ त्याने तातडीने सर्वांना अलर्ट केले़ पोलिसांनी पुढे लगेच नाकाबंदी केली व या चोरट्यांना जेरबंद केले़ पोलीस मित्र व व्हॉटसअॅप ग्रुपचा असाही उपयोग गुन्ह्यांच्या तपासासाठी होत आहे़