कर्णधार धोनीचा अखेरचा सामना पाहण्यासाठी ब्रेबॉर्नवर तूफान गर्दी
By admin | Published: January 10, 2017 02:52 PM2017-01-10T14:52:20+5:302017-01-10T15:10:52+5:30
भारतीय संघासाठी अखेरचे कर्णधारपद भूषविणा-या महेंद्रसिंग धोनीचे ‘कूल’ नेतृत्व पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
Next
>रोहित नाईक,
मुंबई, दि. १० - मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर होत असलेला भारत ‘अ’ विरुध्द इंग्लंड सराव एकदिवसीय सामना भारतीय क्रिकेटसाठी खास आहे. भारतीय संघासाठी अखेरचे कर्णधारपद भूषविणा-या महेंद्रसिंग धोनीचे ‘कूल’ नेतृत्व पाहण्याची संधी सहजासहजी सोडतील ते क्रिकेटप्रेमी कसले? आणि यासाठीच क्रिकेटप्रेमींची सुमारे दिड ते दोन किमी रांग स्टेडियमबाहेर प्रवेशाच्या प्रतीक्षेत बघायला मिळाली. मंगळवारी होत असलेल्या या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींना मोफत प्रवेश होता.
परंतु, मोजक्याच जागेसाठी प्रवेश असल्याने दुपारी १.३० वाजता सुरु होणा-या या सामन्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासूनच क्रिकेटप्रेमींनी ब्रेबॉर्न स्टेडियमबाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली होती. शिवाय पोलिस बंदोबस्तही चोख असल्याने इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांच्यावेळी असणारी नियमावली या सराव सामन्यासाठीही कायम होती. यामुळे क्रिकेटप्रेमींना बॅग आणि पाण्याच्या बाटल्या जवळ बाळगण्याची अनुमती नव्हती. शिवाय सुरुवातीला क्रिकेट क्लब आॅफ इंडियाने (सीसीआय) उत्तर आणि पूर्वेकडील स्टँड खुले केले होते. मात्र, तरीही मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमीं बाहेर राहिल्याने अखेर सीसीआयला पश्चिमेकडील स्टँडही खुले करावे लागले.
बस स्टँडच्या रिकाम्या जागेत बॅगा ठेवून मैदानात प्रवेश
कर्णधार धोनीचे अखेरचे नेतृत्व करण्यासाठी क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी होणार हे अपेक्षितंच होते. त्यामुळे स्टेडियमबाहेर पहाटेपासूनच पोलीस बंदोबस्त होता. शिवाय स्टेडियममध्ये बॅग आणि पाण्याच्या बाटल्या सोबत नेण्यास मनाई असल्याचे कळाल्यानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले. मात्र, यावरही त्यांनी नामी शक्कल काढली. स्टेडियमबाहेर असलेल्या बेस्ट बस स्टँडवरील रिकामी जागेत क्रिकेटप्रेमींनी आपआपल्या बॅग ठेवण्याची ‘बेस्ट’ जागा शोधून काढली. दखल घेण्याची बाब म्हणजे हा सर्व प्रकार ड्युटीवर असलेल्या पोलिसासमोर होत होता.
शिवाय यातील बहुतेकजण कॉलेज विद्यार्थी असल्याने या बॅगचे पुढे काय होईल याची कोणालाही चिंता नसल्याचे आश्चर्य पोलिसांनी व्यक्त केले. चर्चगेट परिसरात जय हिंद कॉलेज, सिडनहॅम कॉलेज, गर्व्हमेंट लॉ कॉलेज, एलफिस्टन कॉलेज, सिध्दार्थ कॉलेज, मुंबई विद्यापीठ, केसी कॉलेज असल्याने कॉलेजियन्सचा मोठी उपस्थिती या सामन्याला होती.
धोनी... धोनी...
क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये धोनी.. धोनी चा जयघोष करतच स्टेडियममध्ये प्रवेश केला. सर्वांच्या नजरा धोनीची एक झलक पाहण्यासाठी लागल्या होत्या. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून अखेरची नाणेफेक हरल्यानंतरही केवळ धोनीचाच जयघोष सुरु होता. एकूणच आपल्या लाडक्या कर्णधारासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेल्या क्रिकेटप्रेमींनी हा सामना धोनीमय करुन टाकला.