चक्रीवादळामुळे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 04:54 AM2020-06-04T04:54:06+5:302020-06-04T04:54:19+5:30

महसूल मंत्री थोरात; सतर्क रहाण्याचे आवाहन

Hurricane damage; Order to conduct panchnama | चक्रीवादळामुळे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

चक्रीवादळामुळे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यावर कोरोनापाठोपाठ निसर्ग वादळाचे संकट आले असून या वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत. वादळ पुढे सरकले असले तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे समुद्र किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्क राहाण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


अद्याप पर्यंत राज्यात कुठेही जीवित हानी झालेली नाही. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहत, असेही त्यांनी सांगितले. या चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडली आहेत, परिणामी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी तारा तुटल्या, विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. प्रशासन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. मुंबईला असलेला चक्रीवादळाचा धोका कमी झालेला असला तरी पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. हे चक्रीवादळ केंद्रबिंदूपासून सरासरी दोनशे किलोमीटर पर्यंत परिणाम करते. निसर्ग चक्रीवादळाची दिशा बघता पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासन दक्ष असल्याचे थोरात यांनी सांगितले.


काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री थोरात यांना दूरध्वनी करून निसर्ग चक्रीवादळाबाबत माहिती जाणून घेतली. या वादळामुळे कोकणातील रायगड, उरण, पेण, पालघर, श्रीवर्धन, तसेच राज्याच्या इतर भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईसह कोकणात एनडीआरएफ आणि तटरक्षक दलाच्या टिम तैनात असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

Web Title: Hurricane damage; Order to conduct panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.