चक्रीवादळ मुंबईत धडकणार ?, मच्छीमारांना दोन दिवस समुद्रात न जाण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 09:04 PM2017-12-03T21:04:23+5:302017-12-03T21:04:46+5:30
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ सहा किलोमीटर प्रतितास या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकत असले, तरी त्याची तीव्रता कमी होत आहे.
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ सहा किलोमीटर प्रतितास या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकत असले, तरी त्याची तीव्रता कमी होत आहे. मात्र असे असले, तरी ते मुंबईपासून एक हजार किलोमीटर अंतरावर असून, समुद्र खवळलेलाच राहणार आहे. परिणामी, सुरक्षेची खबरदारी म्हणून 4 आणि 5 डिसेंबरला मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले आहे. दरम्यान, मुंबईला ‘ओखी’चा धोका लक्षात घेत, गिरगाव चौपाटीवर जीवरक्षकांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘ओखी’ चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रालगत दक्षिणेकडे 1 हजार किलोमीटरवर आहे. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होईल. मात्र, ते पुढे सरकेल. याचा परिणाम म्हणून गोव्यासह महाराष्ट्राच्या किना-यावरील समुद्र खवळलेला असेल. परिणामी, 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवशी मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. लहान बोटींनीसुद्धा समुद्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह सागरी किना-यावर 4 डिसेंबर रोजी अंशत: आणि 5 डिसेंबर रोजी पावसाचीही स्थिती राहू शकते. 5 डिसेंबर रोजी मुंबई, कोकणात सागरी भागात वा-याची तीव्रता अधिक असेल. या कारणात्सव नागरिकांनी सतर्क राहावे, अशी माहितीही हवामान खात्याकडून देण्यात आली. चक्रीवादळामुळे हवामानात बदल होत असून, किमान तापमानात वाढ होईल आणि थंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.