कामावर जाण्याच्या घाईत पोहोचला कोठडीत
By admin | Published: May 17, 2017 02:13 AM2017-05-17T02:13:14+5:302017-05-17T02:13:14+5:30
कामावर जाण्यासाठी कारने भरधाव वेगाने निघालेल्या कॉल सेंटरच्या खासगी चालकाला ही घाई भलतीच महागात पडली आहे. त्याच्यामुळे दोन जण जखमी झाले. याप्रकरणी दादर पोलिसांनी
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कामावर जाण्यासाठी कारने भरधाव वेगाने निघालेल्या कॉल सेंटरच्या खासगी चालकाला ही घाई भलतीच महागात पडली आहे. त्याच्यामुळे दोन जण जखमी झाले. याप्रकरणी दादर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विनोदकुमार यादव असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वरळी परिसरात राहणारा यादव कॉल सेंटरमध्ये चालक म्हणून काम करतो. तेथील कर्मचाऱ्यांची ने- आण करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. सोमवारी रात्री १च्या सुमारास त्याला कॉल सेंटरला पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे तो कारने भरधाव वेगाने निघाला. ८० ते १००च्या वेगाने जात असताना, दादर सेनापती बापट मार्गावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. वाटेतल्या दोन दुचाकींना धडक देत त्याची कार पुढे गेली. येथील कामगार मैदान येथून वळण घेत असताना, त्याने आणखी एका ओमनी कारला धडक दिली आणि सॉरी बोलून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पुढे अडविले. तेव्हा कामावर जाण्यास उशीर झाला म्हणून तो सुसाट निघाल्याची माहिती त्याने दादर पोलिसांना दिली.
कामावर वेळेत न पोहोचल्यास नोकरी जाईल, या भीतीने त्याचे लक्ष कामावर होते, असेही यादवने पोलिसांना सांगितले. या अपघातात तोही जखमी झाला आहे. तर जखमी झालेले दुचाकीस्वार ओंकार शिरिषकर (२१), गुंजन सतवीर (२३) यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दादर पोलिसांनी यादवला अटक केली आहे. तो दारूच्या नशेत नव्हता, हे तपासात उघडकीस आले आहे.