घाई करा ! जुन्या नोटा जमा करण्याचा आजचा शेवटचा दिवस
By admin | Published: December 30, 2016 09:49 AM2016-12-30T09:49:07+5:302016-12-30T09:52:35+5:30
चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 30 डिसेंबरनंतर जुन्या नोटा केवळ रिझर्व्ह बँकमध्ये 31 मार्चपर्यंत बदलून मिळणार आहेत. रिझर्व्ह बँकेतही जुन्या नोटा जमा करताना केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या मुदतीच्या आत तुम्ही नोटा का बदलून घेतल्या नाहीत?, शिवाय संबंधित पैशाच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे?, याचीही माहिती द्यावी लागणार आहे. तसेच जुन्या नोटा बाळगणा-यांसमोर केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकुमानुसार अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. जारी करण्यात आलेल्या वटहुकुमानुसार जर कुणाकडे 10 हजारपेक्षा अधिक 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या तर संबंधित व्यक्तीला कमीत कमी 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.
दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जुन्या नोटा जमा करण्यासाठी तुम्हाला फॉर्म 5 भरावा लागेल. सोबत एक ओळखपत्र आणि दिलेल्या मुदतीत नोटा का जमा केल्या नाही, याची माहितीही द्यावी लागेल. मात्र, किती प्रमाणात नोटा बदलून दिल्या जाणार आहेत? तसेच याआधीही नोटा बदलून घेणा-या व्यक्तीला नोटा जमा करण्यासाठी किती वेळा संधी दिली जाणार आहे, याबाबतची माहिती अजूनही आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही. शिवाय ग्राहकांच्या खात्यात केवायसी गरजेचे आहे. ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, नरेगा कार्ड किंवा पॅन कार्ड चालणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा, बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदी निर्णयाची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी देशवासियांनी 30 डिसेंबरपर्यंत स्वतःजवळ असलेल्या 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले होते.