कागदपत्रांसाठी धांदल
By admin | Published: June 9, 2016 12:59 AM2016-06-09T00:59:00+5:302016-06-09T00:59:00+5:30
प्रवेशप्रक्रियेत मुख्यत्वेकरून कागदपत्रे महत्त्वाची असतात. याच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रे व तहसील कार्यालय गर्दीने भरली आहेत.
पुणे : प्रवेशप्रक्रियेत मुख्यत्वेकरून कागदपत्रे महत्त्वाची असतात. याच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रे व तहसील कार्यालय गर्दीने भरली आहेत. त्यामध्ये जातीचा दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमीलेअरची जुळवाजुळव करण्यासाठी पालकांचीही धांदल उडाली आहे.
त्यातच नागरी सुविधा केंद्रचालकांचेही तहसील कार्यालयात हेलपाटे सुरू आहेत. दिवसाला साधारणत: ५०० नागरिक दाखल्यासाठी नोंदणी करीत आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयातही दाखले वेळेत कसे मिळतील, यावर भर दिला आहे.
प्रवेशप्रक्रियेच्या कालावधीतच कागदपत्रे मिळविण्यासाठी आवश्यक असल्याने जास्त पैसे भरण्याची तयारीही काही पालकांनी दर्शविली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांनी दहावी प्रवेशानंतर प्रथमच कागदपत्रांची जुळवाजुळव करीत असल्याने, तसेच पालकांना माहिती अपुरी असल्याने धांदल उडत आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात चौकशी विभाग स्वतंत्र असणे आवश्यक आहे. कारण, बहुधा कित्येक नागरिकांना याबद्दल हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे.
तहसील कार्यालयात कागदपत्रांसाठी रांगा लागल्या आहेत. वेळेतच कागदपत्रे कशी मिळतील, यासाठी पालकांची शर्यत लागली आहे. काही पालकांनी कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी कामावरून सुट्या टाकल्या आहेत, तर काही पालक ठरलेल्या वेळेत कागदपत्रे तयार करून मिळत नसल्याने संताप व्यक्त करीत आहे. उत्पन्नाचा व रहिवासी दाखला सात दिवसांच्या आत मिळणे बंधनकारक आहे, तर जात प्रमाणपत्र हे १५ दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे. यासाठी पालकांचा खटाटोप सुरू आहे.
मात्र, तहसील कार्यालयात यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. नायब तहसीलदार ज्योती जाधव व काही कर्मचाऱ्यांच्या टेबलाभोवती नागरिक गराडा घालून बसले आहेत, तर काही नागरिक कागदपत्रे वेळेत पूर्तता करूनही मिळत नसल्याने नायब तहसीलदार यांच्याकडे विनवण्या करीत आहेत. मात्र, तहसील कार्यालयात कागदपत्रे पाहणीसाठी कर्मचाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडत आहे. (प्रतिनिधी)