विषारी औषध घेऊन पती-पत्नीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:34 PM2019-06-09T13:34:33+5:302019-06-09T13:35:07+5:30
सांगोला तालुक्यातील अजनाळे गावातील घटना
सांगोला : अज्ञात कारणावरून पती- पत्नी दोघांनीही विषारी औषध प्राशन केल्याने उलट्यांचा त्रास सुरू झाला म्हणून पुतण्याने उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच पत्नीचा व उपचारासाठी सोलापूरला घेऊन जाताना पतीचा वाटेतच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री अजनाळे (ता सांगोला) येथे घडली आहे. संदिपान मारुती खांडेकर (वय 55) व आंबुताई संदिपान खांडेकर (वय 50) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
सहा महिन्यांपूर्वी पत्नी आंबुताई हिने अशाच प्रकारे चहात विष घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो फसल्याने पुन्हा शनिवारी मध्यरात्री जेवणात विष कालवून पत्नीने पतीसह आपली जीवनयात्रा संपविली.
अजनाळे येथील संदिपान मारुती खांडेकर हे पत्नी आंबुताईसह येथील खांडेकर येड्रावकर वस्ती येथे राहतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून दोघेही विवाहित आहेत. घरची शेतजमीन नसल्याने मुलगा मुंबई येथे पिठाची गिरणी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. दरम्यान आंबुताई हिने रात्री नऊच्या सुमारास जेवण बनविताना भाजीत विषारी औषध कालवून पती संदिपान खांडेकर यांच्यासह स्वतः जेवण केले मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनाही उलट्यांचा त्रास सुरू झाला म्हणून सुट्टी निमित्त आजी-आजोबांकडे आलेली नात गुड्डी विष्णू माने हिने शेजारील चुलत मामा सुदाम विठ्ठल खांडेकर यांना हा प्रकार सांगितला. सुदाम खांडेकर यांनी तात्काळ खाजगी वाहनातून पती-पत्नींना उपचाराकरिता सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले असता उपचारापूर्वीच आंबुताई हिचा मृत्यू झाला तर पती संदिपान खांडेकर यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना सोलापूरला घेऊन जाण्यास सांगितले, मात्र उपचारापूर्वीच संदिपान खांडेकर यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
पत्नी आंबुताई हिचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले असून संदिपान यांचे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून दोघांचेही मृतदेह अजनाळे गावी नेण्यात आले रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ पूजा साळे यांनी पोलिसात खबर दिली आहे.
------------------------
म्हणून नातीचे वाचले प्राण
अंबुताईने आमटीत विषारी औषध कालविल्याने जेवणापूर्वी नात गुड्डीला दमदाटी व मारहाण करून जेवण करण्यापासून रोखले होते, म्हणून रागाने आजीवर रुसून गुड्डी उपाशीपोटीच झोपली होती. विषारी औषध असलेली आमटी खाण्यापासून रोखल्याने नात गुड्डी हिचे प्राण वाचले.