पतीसह त्याच्या मित्राविरुद्धही गुन्हा दाखल
By admin | Published: April 29, 2016 12:55 AM2016-04-29T00:55:05+5:302016-04-29T00:55:05+5:30
पोलिसांत तक्रार करणाऱ्या महिलेचा तिच्या पतीनेच बेडरूम व बाथरूमध्ये कॅमेरा लावून अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा
पुणे : पोलिसांत तक्रार करणाऱ्या महिलेचा तिच्या पतीनेच बेडरूम व बाथरूमध्ये कॅमेरा लावून अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा; तसेच पतीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या मित्राविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्वेनगर येथील पीडित ३१ वर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे सुमारे १४ वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्यांना एक मुलगी आहे. तिचा पती आणि मित्र या दोघांचा मालवाहतुकीचा व्यवसाय आहे. पतीकडून शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याने तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार २०१३ मध्ये त्याची तक्रार केली आहे. दरम्यानच्या काळात पतीने दुसऱ्या महिलेशी विवाह केला. ही महिला पीडित महिलेच्या पतीसोबतच राहत होती. याच काळात पतीचा मित्र काही दिवसांसाठी त्यांच्याकडे राहण्यास आला. याकाळात पतीने त्याच्या मदतीने घरातील बेडरूम व बाथरूमध्ये कॅमेरा लावला. त्याआधारे पीडित महिलेचे अश्लील व्हिडिओ बनविले. (प्रतिनिधी)
>अश्लील व्हिडिओ व फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन संबंधित व्यक्तीने पीडितेवर बलात्कार केला. तसेच तिला ब्लॅकमेल करीत १५ लाख ८० हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा २५ लाख रुपयांची मागणी केली. या त्रासाला कंटाळलेल्या महिलेने वारजे-माळवाडी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार तिचा पती, त्याचा मित्र आणि दुसऱ्या पत्नीच्या विरोधात बलात्कार, आयटी अॅक्ट, खंडणी अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील असून, सध्या पसार झाले आहेत.