पत्नीच्या विरहात पतीचा गळफास; पत्नीचा झाला होता अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 02:39 AM2020-03-10T02:39:36+5:302020-03-10T02:39:55+5:30
सार्थक संजय बचाटे व त्याची पत्नी चंदा सार्थक बचाटे (२०) यांचा १० फेब्रुवारी रोजी गंगाखेड येथून गावी वडगाव स्टेशनकडे दुचाकीवरून जाताना अपघात झाला़
गंगाखेड (जि. परभणी) : महिनाभरापूर्वी अपघाती निधन झालेल्या पत्नीच्या विरहात सार्थक संजय बचाटे (२५) या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ९ मार्च रोजी सकाळी ९़३० वाजेच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन शिवारात घडली़ या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
सार्थक संजय बचाटे व त्याची पत्नी चंदा सार्थक बचाटे (२०) यांचा १० फेब्रुवारी रोजी गंगाखेड येथून गावी वडगाव स्टेशनकडे दुचाकीवरून जाताना अपघात झाला़ या अपघातात चंदा बचाटे यांचा मृत्यू झाला होता़ तेव्हापासून मानसिक तणावात असलेल्या सार्थक बचाटे या तरुणाने ९ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शेतात जाऊन स्वत:च्या मोबाईलवर पत्नीच्या नावे ‘चंदाराणी मी तुला भेटायला यायलो’ असे लिहित पत्नीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले़ तसेच आई, पप्पा, दाजी, ताई मला माफ करा, मी चाललो, भावांनो तुम्हाला आज सोडून चाललो, माझ्या मरणाला कोणीही जबाबदार नाही, असे स्टेटस शेअर करून वडगाव तांड्यावरील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. सार्थकने आत्महत्या केल्याचे समजताच कुटुंबियांनी शेतात धाव घेतली़ त्याला गंगाखेड येथील रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले़ या घटनेबद्दल वडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ या प्रकरणी गंगाखेड ठाण्यात नोंद करण्यात आसली असून तपास सपोनि. राजेश राठोड हे करीत आहेत़
अन् मित्र व नातेवाईकांची घटनास्थळाकडे धाव
सार्थक बचाटे यांनी मोबाईलवर ठेवलेले स्टेटस पाहून त्यांच्या संपर्कातील मित्र व नातेवाईकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली़ तेव्हा कुटुंबातील सदस्यांकडून तो प्रात:विधीसाठी शेतात गेल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी त्यांच्या शेताकडे धाव घेतली़ त्यानंतर सार्थक बचाटे याने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला असल्याचे दिसून आले़ त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली़ मित्र व नातेवाईकांच्या मदतीने सार्थकचा गळफास काढून त्यास गंगाखेड येथील रुग्णालयात दाखल केले.