सौभाग्याच्या रक्षणासाठी पत्नीने दिली पतीला किडनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 05:25 PM2019-06-17T17:25:12+5:302019-06-17T17:28:08+5:30
करमाळा शहरातील घटना; किडनीदान करून पतीला मिळवून दिले जीवदान
करमाळा : अपघातात पतीराजांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या... पत्नीला काय करावं काही नाही सुचेना... कुटुंबाचा आधारवड जिवंत ठेवण्याबरोबर स्वत:च्या सौभाग्याचं रक्षण व्हावं म्हणून तिनं कसलीच पर्वा न करता किडनी दान करून पतीला जीवदान मिळवून दिलं.
करमाळा शहरातील दत्त पेठेत राहणारे अजित विनायक मसलेकर यांचा स्वाती हिच्याबरोबर १९९४ मध्ये विवाह झाला. अजित हे जैन ठिंबक सिंचन, किर्लोस्कर इंजिन व मोटर्सचे अधिकृत विक्रेते आहेत. पत्नीबरोबर सुखासमाधानात संसार करीत असताना २०१० मध्ये अजित मोटरसायकलवरून शेतातून घरी येत असताना त्यांचा अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या.
मसलेकर कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. डॉ. संजय कोग्रेकर यांनी प्राथमिक उपचार करून कुटुंबीयांना धीर देत पुणे येथील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला .
अजित मसलेकर यांना जीवदान देण्यासाठी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे अवश्यक होते. अजयचे भाऊ विजय यांनी आपली किडनी देण्याची तयारी दर्शविली होती; पण स्वाती मसलेकर यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न क रता क्षणाचा विलंब न लावता आपल्या पतीला जीवदान मिळावे, यासाठी २५ जून २०१० रोजी तिने किडनीदान केले.
केवळ पत्नीमुळेच मी जिवंत- अजय मसलेकर
अपघातात दोन्ही किडन्या फेल झाल्याने मी हताश झालो होतो, पण पत्नी स्वातीने धीर देत तिच्या जीवाची पर्वा न करता स्वत:ची एक किडनी मला दान केली व माझा पुनर्जन्म झाला. आम्ही दोघे आनंदात संसार करीत आहोत. सर्वात श्रेष्ठदान अवयव दान असेच मला म्हणायचे आहे, असे अजय मसलेकर यांनी सांगितले. आज मी आनंदी जीवन जगत आहे, त्याला केवळ आणि केवळ म्हणजे माझी पत्नी स्वाती.