पतीची शिवीगाळ ही क्रूरता नव्हे !
By Admin | Published: January 2, 2016 08:34 AM2016-01-02T08:34:47+5:302016-01-02T08:34:47+5:30
पती-पत्नीचे भांडण झाले असेल आणि पतीने पत्नीला शिविगाळ केली असेल तर, अशावेळी पतीची ही कृती पत्नीसोबतची क्रूरता ठरत नाही. केवळ एवढ्या कारणावरून पतीला भांदविच्या
- राकेश घानोडे, नागपूर
पती-पत्नीचे भांडण झाले असेल आणि पतीने पत्नीला शिविगाळ केली असेल तर, अशावेळी पतीची ही कृती पत्नीसोबतची क्रूरता ठरत नाही. केवळ एवढ्या कारणावरून पतीला भादंविच्या कलम ४९८-अ (विवाहितेशी क्रूरतापूर्ण वागणूक) अंतर्गत दोषी ठरविले जाऊ शकत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे.
कोंढाळी, ता. काटोल येथील गणेश पांडुरंग कोचे (३७) हा टीव्ही व ५० हजार रुपयांसाठी शारीरिक व मानसिक छळ करतो अशी तक्रार त्याची पत्नी रश्मीने पोलीस ठाण्यात नोंदविली होती. पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर ४ नोव्हेंबर १९९९ रोजी काटोल येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने आरोपीला भांदविच्या कलम ४९८-अ अंतर्गत तीन महिने सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती.
या निर्णयाविरुद्ध गणेश कोचे याने नागपूर सत्र न्यायालयात अपील केले होते. ७ नोव्हेंबर २००६ रोजी सत्र न्यायालयानेही हे अपील फेटाळून जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. परिणामी आरोपीने उच्च न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्वाळा देत गणेशला निर्दोष सोडण्याचे निर्देश दिले. कोचे दाम्पत्य जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून त्यांना एक मुलगा आहे.
पुरावे अस्पष्ट
कनिष्ठ न्यायालयात आरोपीला एकट्या रश्मीच्या जबाबावरून शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयाने आरोपीला निर्दोष सोडताना रश्मीच्या जबाबात एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, रश्मीच्या जबाबाचे समर्थन करणारा अन्य साक्षीदार नसल्याचे व प्रकरणातील पुरावे अस्पष्ट असल्याचे नमूद केले.
कुटुंब न्यायालयाने
मंजूर केला घटस्फोट
सार्वजनिक ठिकाणी पत्नीशी व्यवहार करताना तिची बदनामी होईल, अशी भाषा वापरणे आणि सातत्याने तिला शिवीगाळ करणे, ही एक प्रकारची क्रूरताच आहे, असे म्हणत दोनच दिवसांपूर्वी वांद्रे कुटुंब न्यायालयाने ३० वर्षीय महिलेला तिच्या ४४ वर्षीय पतीपासून घटस्फोट दिला होता.