विभक्त राहणाऱ्या पत्नीवर पतीचा बलात्कार
By Admin | Published: June 23, 2016 08:26 PM2016-06-23T20:26:20+5:302016-06-23T20:26:20+5:30
कौटुंबिक वादाच्या सुनावणीसाठी खुलताबाद न्यायालयात आलेल्या विभक्त राहणाऱ्या पत्नीस गोड बोलून म्हैसमाळ परिसरातील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीस पोलिसांनी
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २३ - कौटुंबिक वादाच्या सुनावणीसाठी खुलताबाद न्यायालयात आलेल्या विभक्त राहणाऱ्या पत्नीस गोड बोलून म्हैसमाळ परिसरातील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीस पोलिसांनी अटक केली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
खुलताबाद पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील कसाबखेडा येथील पीडित महिलेला विभक्त राहणाऱ्या पतीने बुधवारी (दि.२२) ४ वाजेच्या सुमारास म्हैसमाळ परिसरात जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
कसाबखेडा येथील महिलेचा विवाह पोटूळ (ता. गंगापूर) येथील महेश कृष्णा कापसे याच्याशी झाला होता. काही दिवस त्यांचा संसार चांगला सुरू असताना त्यांना मुलगीही झाली. त्यातच घरगुती कारणावरून त्यांच्यात कुरबुर व वाद सुरू झाला. हा वाद थेट न्यायालयात पोहोचला. सदरील महिलेने पती महेश कापसेविरुद्ध हुंड्याची मागणी करून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. हे प्रकरण खुलताबाद दिवाणी न्यायालयात सुरू आहे. न्यायालयात वाद सुरू असून, दोघेही पती-पत्नी गेल्या काही महिन्यांपासून विभक्त राहत आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दोघेही बुधवारी न्यायालयात आले होते.
न्यायालयात तारीख संपल्यानंतर महेश कापसे याने पत्नीला म्हैसमाळ येथे जाऊन सविस्तर चर्चा करून लहान मुलीच्या शिक्षणासाठी काही पैसे देतो, असे सांगून तिला म्हैसमाळ येथे नेले. डोंगर परिसरात तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. पत्नीसोबत न्यायालयात प्रकरण सुरू असताना व विभक्त राहत असूनही खोटे बोलून महेश कापसेने पत्नीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याने पीडित महिलेने दिलेल्या फियार्दीवरून आरोपी पती महेश कापसेविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात कलम ३७६ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत हे करीत आहेत.