पत्नी, दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या; घरगुती भांडणातून प्रकार, चौघांचे मृतदेह घाटात आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:07 AM2017-12-13T01:07:05+5:302017-12-13T01:07:13+5:30
घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीचा खून करून मुलींना गळफास देत पतीने आत्महत्या केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील पिलीव घाटात घडली.
माळशिरस/श्रीपूर (जि. सोलापूर) : घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीचा खून करून मुलींना गळफास देत पतीने आत्महत्या केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील पिलीव घाटात घडली.
उंबरे-वेळापूर (चंडकाईवाडी) येथील रहिवासी सुभाष श्यामराव अनुसे (वय २८) याने सातारा-पंढरपूर रस्त्यालगत असणाºया वनखात्याच्या हद्दीत लिंबाच्या झाडाला सूताच्या दोरीने गळफास घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी स्वाती (२५) हिचे डोके ठेचून हत्या केली. दोन मुली ऋतुजा (९) व प्रणिता उर्फ कविता (८) यांना एकाच दोरीने एका झाडाला गळफास दिला. दोन्ही मुली शाळेच्या गणवेशात होत्या.
सुभाष अनुसे यांचा विवाह १५ वर्षांपूर्वी स्वाती हिच्याशी झाला होता. तीन वर्षांपासून भांडणाला कंटाळून स्वाती माहेरी राहत होती. नुकतीच काही दिवसांपासून ती नांदावयास आली होती. सुभाष हे ११ डिसेंबर रोजी अकलुजला
दवाखान्यात जातो, असे सांगून पत्नी, दोन मुलींना घेऊन मोटारसायकलवरून गेले होते. ते परत न आल्याने त्यांच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली. त्या दरम्यान, चौघांचेही मृतदेह घाटात मिळाले.
हत्या की आत्महत्या ?
मयत सुभाष अनुसे याच्या खिशात आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी व चालू स्थितीतील मोबाइल आढळून आला. जवळच मोटारसायकल व रक्ताने माखलेला दगड मिळाला. प्राथमिक अंदाजानुसार पत्नी व मुलांना मारून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, तीन जणांना एकट्याने एका वेळी कसे मारले? याचा उलगडा होत नसल्याने हत्या तर नसावी ना, यादृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.