धुळ्यात प्रियकराच्या मदतीने पतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2016 09:32 PM2016-07-28T21:32:58+5:302016-07-28T21:32:58+5:30
प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून करून नंतर त्याचा मृतदेह थेट तोरणमाळ येथील सिताखाईत फेकुन दिल्याची धक्कादायक घटना धुळे शहरातील शिवसागर कॉलनीत घडल्याचे गुरुवारी उघडकीस आले़
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. २८ : प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून करून नंतर त्याचा मृतदेह थेट तोरणमाळ येथील सिताखाईत फेकुन दिल्याची धक्कादायक घटना धुळे शहरातील शिवसागर कॉलनीत घडल्याचे गुरुवारी उघडकीस आले़ याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एल़सी़बी) पथकाने मयतची पत्नी व तिचा प्रियकर या दोघांना अटक केली. त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले़ दोघांना सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे़
कोमल युवराज परदेशी (वय ३० रा़ शिवसागर कॉलनी, चित्तोड रोड, धुळे) व प्रणिल मराठे (रा़ संगमा चौक) या दोघांचे अनैतिक संबंध होते़ त्यांना पती युवराज भिला परदेशी हा अडथळा ठरत होता़ या कारणावरून दोघांनी युवराज परदेशी याचा खून करून त्याचा मृतदेहाची विल्हेवाट तोरणमाळ येथील सीताखाईत लावली. ही घटना २ ते ४ जुलै दरम्यान घडली. त्यानंतर त्यांनी युवराज परदेशी बेपत्ता झाल्याचा बनाव केला. परंतु नंतर पोलीस तपासात युवराजचा खून झाल्याचे गुरुवारी उघडकीस आले.
याबाबत दीपक भिला परदेशी (रा़ कालिकादेवी नगर, गोळीबार टेकडी, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके करत आहेत़