महिला पोलिसावर पतीचा चाकूहल्ला

By admin | Published: October 19, 2016 02:16 AM2016-10-19T02:16:23+5:302016-10-19T02:16:23+5:30

चारकोप परिसरात महिला पोलिसावर पतीनेच चाकूने जीवघेणा हल्ला चढविण्याची घटना घडली.

Husband's spouse on women's police | महिला पोलिसावर पतीचा चाकूहल्ला

महिला पोलिसावर पतीचा चाकूहल्ला

Next


मुंबई : चारकोप परिसरात महिला पोलिसावर पतीनेच चाकूने जीवघेणा हल्ला चढविण्याची घटना घडली. मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी या महिलेच्या पतीला अटक केली आहे.
संगीता सुर्वे अहिरेकर (२६) असे जखमी महिला पोलिसाचे नाव आहे. त्या अंधेरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. चारकोपच्या सह्याद्रीनगरमधील सदगुरू अपार्टमेंटमध्ये अन्य तीन महिला पोलीस शिपाईंसोबत भाडे तत्त्वावर राहतात.
चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास संगीता यांचा पती प्रीतम अहिरेकर या ठिकाणी आला. त्याने दरवाजा ठोठावला तेव्हा रूम पार्टनरने दरवाजा उघडला. तेव्हा ‘माझ्या बायकोशी मला बोलायचे आहे’ असे त्याने सांगितले. मात्र हा नेमका कोणत्या उद्देशाने आला याची काहीच माहिती नसल्याने त्याला घरात येण्याची परवानगी दिली. तसेच पती-पत्नीच्या खासगी विषयात आपण नको पडायला असा विचार करत बाकी महिला आपल्या कामाला लागल्या. काही वेळ या दोघा नवरा-बायकोने आपापसात चर्चा केली आणि अचानक त्यांच्यात भांडण सुरू झाले. तेव्हा संगीता यांच्या पतीने सोबत आणलेल्या चाकूने त्यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. तेव्हा वेदनेने ओरडणाऱ्या संगीता यांचा आवाज ऐकून त्यांना वाचविण्यासाठी रूम पार्टनर माळी आणि सुतार धावून गेल्या. त्यांनी आरडाओरड सुरू केली तसेच हल्लेखोर पतीला अडवून त्याला पकडले. त्यानंतर लगेचच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानुसार चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रीतमला अटक केली.
प्रीतम हा ‘बेस्ट’मध्ये कारकून म्हणून कार्यरत असल्याचे चारकोप पोलिसांनी सांगितले. संगीता यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये संगीताचे प्रीतमसोबत लग्न झाले. मात्र त्यांच्यात काही खासगी कारणावरून सतत वाद सुरू होते. याला कंटाळून संगीता पतीपासून वेगळ्या राहत होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Husband's spouse on women's police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.