खा. हुसेन दलवाई यांचा ई-मेल हॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:48 AM2018-10-18T05:48:32+5:302018-10-18T05:48:34+5:30
नागपूर : इंटरनेट हॅकर्स लोकांना फसविण्यासाठी कोणत्या युक्त्या करतील हे कुणीही सांगू शकत नाही. राज्यसभेतील काँग्रेसचे सदस्य हुसेन दलवाई ...
नागपूर : इंटरनेट हॅकर्स लोकांना फसविण्यासाठी कोणत्या युक्त्या करतील हे कुणीही सांगू शकत नाही. राज्यसभेतील काँग्रेसचे सदस्य हुसेन दलवाई यांचा ई-मेल अकाऊंट हॅक करून त्याद्वारे सहकाऱ्याच्या मुलीवर तातडीची शस्त्रक्रिया करावयाची असल्याने पैसे पाठविण्याची याचना करणारे ई-मेल पाठविण्यात आले आहेत. या सापळ्यात सापडून अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यताही आहे.
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना १६ आॅक्टोबरला दलवाई यांच्या ई मेल अकाऊंटवरुन असाच एक ई-मेल मिळाला. दलवाई ‘मोठ्या संकटात सापडले आहेत’ आणि त्यांना विजय दर्डा यांच्याकडून ‘तातडीची मदत’ हवी आहे, असे नमूद करून रिटर्न ई-मेल पाठवून प्रतिसाद देण्याची विनंती हॅकर्सने केली होती. दर्डा यांनी सावध राहून १७ आॅक्टोबरच्या सकाळी ‘मदत हवी असल्यास संपर्क साधावा’, असे त्यांना कळविले. त्याला दुपारी उत्तर आले. ‘दलवाई सध्या देशाबाहेर आहेत व काँग्रेस पक्षातील त्यांच्या एका सहकाºयाच्या मुलीवर तातडीची शस्त्रक्रिया करावयाची असल्याने तिला किरकोळ खर्चासाठी ४५००० रुपये पाठवा. मी येत्या रविवारी भारतात परत आल्यावर तुमचे सर्व पैसे परत करेन. पैशाची व्यवस्था करण्याची तुमची तयारी असेल तर मी माझ्या सहकाºयाच्या बँक खात्याचा तपशील पाठतो,’ असे त्यात म्हटले होते.
हे वाचल्यानंतर दर्डा यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर दर्डा यांच्या कार्यालयाने दलवाई यांचे स्वीय सचिव राजेश पांचाळ यांच्याशी संपर्क साधल्यावर उलगडा झाला. दलवाई यांचा ई-मेल हॅक करण्यात आला आहे आणि राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनाही अशाच प्रकारचा ७५ हजार रुपयांची मागणी करणारा ई-मेल आल्याची माहिती पांचाळ यांनी दिली.