हुसैनीवाला इमारत धोकादायक होती; पालकमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 11:50 AM2017-08-31T11:50:34+5:302017-08-31T12:02:50+5:30
मुंबई, दि. 31- मुंबईतील जेजे मार्ग परिसरात गुरूवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हुसैनीवाला ही पाच मजली इमारत कोसळली. या ...
मुंबई, दि. 31- मुंबईतील जेजे मार्ग परिसरात गुरूवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हुसैनीवाला ही पाच मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 35 ते 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तविली जाते आहे. फायर ब्रिगेड आणि एनडीआरएफच्या टीमकडून युद्धपातळीवर बचावकार्य सध्या सुरू आहे. दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सकाळी दुर्घटना स्थळाची पाहणी केली. हुसैनीवाला ही इमारत धोकादायक होती. या प्रकरणाच्या चौकशीचे तात्काळ आदेश दिले जातील तर प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असं सुभाष देसाई यांनी म्हंटलं आहे. दक्षिण मुंबईत बहुसंख्य इमारती धोकादायक आहेत, त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता तातडीने सोडविला जाईल, असंही सुभाष देसाई म्हणाले आहेत. दुर्घटना झालेली इमारत ही धोकादायक असल्याने काही लोकांनी आधीच घरं रिकामी केली होती. पण काही कुटुंब इमारतीत राहत होते. तेच लोक अपघातात सापडल्याचा दावा सुभाष देसाई यांनी केला आहे.
भेंडीबाजार पाकमोडिया स्ट्रीट भागात असलेल्या हुसैनीवाला या इमारतीला 2013 मध्ये इमारत धोकादायक असल्याची नोटीस बजावण्यात आली होती. तरीही काही कुटुंब इमारतीत राहत होती, अशी माहिती समोर येते आहे. दुर्घटना ठिकाणी अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसंच स्थानिक लोकांकडूनही बचावकार्य केलं जातं आहे. एनडीआरएफचे ४५ जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. इमारतीचे एकुण तीन भाग असून त्यातील दोन इमारती कोसळल्या आहेत तर तिसरी इमारत ही आर्धी कोसळली असून इमारतीचा आर्धा भाग तसाच उभा असल्याची माहिती मिळते आहे.इमारतीच्या शेजारी असलेल्या बैठ्या चाळीवर या इमारती कोसळल्या आहेत. ढिगाऱ्याखाली ३5 ते 40 जण अडकले असावे असं सांगितलं जातं आहे. या दुर्घटनेचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमारतीमध्ये एकूण नऊ कुटुंबं राहत होती. दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारच्या दोन इमारतीमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. ही इमारत 100 ते 125 वर्ष जुनी असल्याचीही माहिती समोर आली आहे. या इमारतीत एकुण 9 कुटुंबं रहात असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. इमारत कोसळल्यानंतर एक-दोन जण स्वतःहून बाहेर आले. हुसेैनीवाला इमारतीमध्ये एकूण 12 खोल्या आणि 6 गोडाऊन होते. या गोडाऊनमध्येही लोकं राहत असल्याचं समजतं आहे.
गेल्या महिभरात मुंबई आणि उपनगरात इमारत कोसळल्याची तिसरी घटना आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी घाटकोपरमध्ये साई दर्शन इमारत कोसळली होती. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर दोन दिवसांपूर्वी विक्रोळीत इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता.
घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
{{{{dailymotion_video_id####x845agh}}}}