शाळांच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ, दिवाळी सुट्ट्यांचा घोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 06:22 AM2021-10-28T06:22:31+5:302021-10-28T06:24:04+5:30
School : दिवाळीसाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी कार्यालयाने १ ते २१ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टीचा कालावधी जाहीर केला होता.
मुंबई : शिक्षण विभागाने ऐन वेळी दिवाळीच्या सुट्ट्यांच्या तारखांत बदल केल्यामुळे शाळांच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ होणार आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या तारखेनुसार शाळांनी तयार केलेले परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.
दिवाळीसाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी कार्यालयाने १ ते २१ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टीचा कालावधी जाहीर केला होता. त्यानुसार, शाळांमध्ये परीक्षांचे आयोजन करून, विद्यार्थ्यांना सुट्टी कालावधीची सूचना देण्यात आली होती. त्यामुळे काही शाळांचे ३० ऑक्टोबरपर्यंत सत्र परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. मात्र, नव्याने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या तारखांमुळे या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.
राज्यातील विद्यार्थी, पालक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिवाळीनिमित्त मूळगावी/परगावी जाण्याचे आरक्षण केले आहे, पण ऐन वेळी सुट्टीच्या तारखांत बदल केल्यास सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे दिवाळी सुट्टीची तारीख बदलू नये, असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले. तर शिक्षण विभागाच्या २७ ऑक्टोबरच्या सुट्ट्यांच्या पत्रकाची सक्ती शाळांवर करू नये आणि आधी नियोजित केलेल्या सुट्ट्या कायम ठेवाव्यात, अशी भूमिका शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मांडली.
माध्यमिक शाळा संहितेनुसार सुट्टी देण्याचे अधिकार शाळांना असताना, बुधवारी शिक्षण सहसचिवांनी काढलेले परिपत्रक व शिक्षणमंत्र्यांनी केलेले सुट्ट्यांचे ट्विट नियमबाह्य आहे, असे भाजप शिक्षक आघाडीचे सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.
शिक्षण विभागातील गोंधळ चव्हाट्यावर
सुट्ट्यांच्या तारखांत झालेल्या बदलामुळे हा शिक्षण विभागातील गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. दीड-दोन वर्षांपासून घरात असलेले पालक व मुलांच्या बाहेर पडण्यासाठी केलेल्या नियोजनात या बदललेल्या निर्णयामुळे अडथळा निर्माण झाला आहे.
- सुशील शेजुळे, पालक व मराठी शाळा संस्था चालक संघटना समन्वयक
नव्या निर्णयामुळे शाळांच्या वेळापत्रकाचे नियोजन यामुळे बिघडणार असून, शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने गोंधळ निर्माण न करता आधीच्या सुट्ट्या कायम ठेवाव्यात.
- राजेश पंड्या, उपाध्यक्ष, शिक्षक लोकशाही आघाडी.