खाडीजवळच्या झोपड्या पावसानंतर तुटणार
By admin | Published: June 10, 2016 03:14 AM2016-06-10T03:14:21+5:302016-06-10T03:14:21+5:30
शास्त्रीनगर, जानकीनगर, महात्मा फुलेनगर, भीमनगर आदी परिसरांची आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तब्बल तीन तास पाहणी केली.
ठाणे : खाडीकिनारी असलेल्या शास्त्रीनगर, जानकीनगर, महात्मा फुलेनगर, भीमनगर आदी परिसरांची आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तब्बल तीन तास पाहणी केली. अनधिकृतपणे खारफुटीची तोड करून बांधण्यात आलेल्या बांधकामांवर पावसाळ्यानंतर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
बुधवारी दुपारी १२ वाजता कळवा चौक येथून शास्त्रीनगर, जानकीनगर, भीमनगर, महात्मा फुलेनगर, अण्णा भाऊ साठेनगर आदी परिसरांची त्यांनी फिरून पाहणी केली. या पाहणीच्या वेळी त्यांनी खाडीकिनारी खारफुटीची तोड करून बांधण्यात आलेल्या झोपडपट्ट्या पावसाळ्यानंतर तोडण्याचे आदेश दिले.
या भेटीदरम्यान त्यांनी कळवा चौक, कळवा स्टेशन रोड आणि बुधाजीनगर येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. बुधाजीनगर येथील रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले. या वेळी आयुक्तांनी भीमनगरपासून साकेतपर्यंत अक्षरश: पाइपलाइनवरून चालतचालत या परिसराची पाहणी केली. पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत परिमंडळ-१ चे उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रतन अवसरमोल, शहर व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, कार्यकारी अभियंता अरविंद इताडकर, कार्यकारी अभियंता मनोज तायडे, सहायक आयुक्त सागर घोलप आदी उपस्थित होते.
दरम्यान, सकाळी आयुक्तांनी तीनहातनाका येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी करून गटार आणि रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, सायंकाळी कावेसर येथील तलावाच्या कामाची पाहणी केली. तलावातील काढलेला गाळ त्वरित उचलणे, आतमध्ये ग्रॅब्रियन भिंत बांधणे, संरक्षक भिंत बांधणे आणि वृक्षारोपण करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे बाळकुम येथील प्रस्तावित सेंट्रल पार्कच्या जागेची, नकाशासह संकल्पचित्राची पाहणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)