हुतात्मा राजगुरु संंघ स्वयंसेवक नव्हते, रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी दिला होता आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:52 AM2018-04-02T04:52:20+5:302018-04-02T04:52:20+5:30
महान क्रांतीकारक हुतात्मा राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, असा दावा माजी प्रचारक नरेंद्र सेहगल यांनी ‘भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता’ या पुस्तकामधून केला आहे. मात्र, हुतात्मा राजगुरु हे संघ स्वयंसेवक नव्हते. ते दैनंदिन संघ शाखेमध्ये जात नव्हते. परंतु, त्यांचा राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील संघ स्वयंसेवकांशी जवळचा संपर्क होता, अशी माहिती राजगुरु यांचे भाचे अरुण घाटपांडे यांनी दिली.
- लक्ष्मण मोरे
पुणे - महान क्रांतीकारक हुतात्मा राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, असा दावा माजी प्रचारक नरेंद्र सेहगल यांनी ‘भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता’ या पुस्तकामधून केला आहे. मात्र, हुतात्मा राजगुरु हे संघ स्वयंसेवक नव्हते. ते दैनंदिन संघ शाखेमध्ये जात नव्हते. परंतु, त्यांचा राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील संघ स्वयंसेवकांशी जवळचा संपर्क होता, अशी माहिती राजगुरु यांचे भाचे अरुण घाटपांडे यांनी दिली.
सेहगल यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये राजगुरु यांचा संघ स्वयंसेवक असा उल्लेख करतानाच सँडर्सच्या वधानंतर ते नागपुरातील संघाच्या महाल येथील मुख्यालयामध्ये येऊन गेल्याचाही दावा करण्यात आला आहे. संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी भरली त्या मोहिते वाड्याच्या शाखेचे ते स्वयंसेवक असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे. यासंदर्भात घाटपांडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी राजगुरु दैनंदिन शाखेत जाणारे स्वयंसेवक नव्हते असे स्पष्ट केले. मात्र, संघाच्या रचनेमध्ये एखादी व्यक्ती एक दिवसासाठी शाखेत येऊन गेली तर त्याला स्वयंसेवक असे संबोधण्यात येते. त्यामुळे कदाचित सेहगल यांनी तसा उल्लेख केला असावा असे स्पष्ट केले.
त्याकाळी राष्ट्रीय विचारांच्या मंडळींशी राजगुरुंचा संपर्क होता. विशेषत: पुण्यातील महाराष्ट्र मंडळ आणि अमरावतीच्या हनुमान व्यायाम मंडळाशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता. बलोपासना केल्या जाणाऱ्या संस्थांशी त्यांचा संपर्क होता. राष्ट्रीय वृत्ती, क्रांतीकार्यामुळे ते काही संघ स्वयंसेवकांच्या संपर्कात आले होते. हनुमान व्यायाम मंडळात त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्याकाळी ते लाठीकाठी शिकवीत असत. संस्कृतचे अध्ययन करण्यासाठी ते काशीला गेले होते. याच काळात त्यांचा चंद्रशेखर आझादांशी संपर्क आला. त्यामधून क्रांतीकार्याची सुरुवात झाली, अशी माहिती घाटपांडे यांनी दिली.
वेळोवेळी मदतही केली
अमरावतीला असताना संघ कार्यकर्ते प्रमोद डोरले यांच्या आजोबांनी त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. काही स्वयंसेवकांनी राजगुरुंना वेळोवेळी मदतही केलेली आहे. मात्र, ते स्वयंसेवक कधीच नव्हते असे घाटपांडे यांनी स्पष्ट केले.