ह्यो कोन्चा इलिक्शन रोग ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2017 02:32 AM2017-01-26T02:32:13+5:302017-01-26T02:32:13+5:30
मानसोपचार तज्ज्ञाचा दवाखाना. प्रचंड गर्दी जमलेली. रांगेतले काही पेशंट दोन कानाला दोन मोबाइल ब्ल्यूटूथ लावून वेगवेगळ्या लोकांशी एकाच वेळी बोलत होते
स्थळ : मानसोपचार तज्ज्ञाचा दवाखाना. प्रचंड गर्दी जमलेली. रांगेतले काही पेशंट दोन कानाला दोन मोबाइल ब्ल्यूटूथ लावून वेगवेगळ्या लोकांशी एकाच वेळी बोलत होते. हे कमी पडलं की काय, म्हणून पुन्हा हातातल्या तिसऱ्या मोबाइलवरून चॅटिंगही करत होते. तिकडून कधी ‘युती’ फिसकटल्याचा मेसेज येताच, कुणी घाम पुसत होतं, तर कधी ‘आघाडी’ झाल्याचं समजताच कुणी बसल्याजागी ‘बंडाचा शड्डू’ ठोकल्यासारखं उगीच चुळबूळ करत होतं. एवढ्यात पिंटकरावांचं नाव पुकारताच, बायजाबाई नवऱ्याला घेऊन आत गेली.
डॉक्टर : या बाई या.. पण काय हो ऽऽ तुमच्या पतीचं नाव असलं कसलं ?
बायजाबाई : त्याचं काय हाय डाक्टर... माज्या सासूबायनं लाडानं यांचं नाव ठिवलं हुतं पिंटू.. पण ल्हानपनी गाव यांना पिंट्या म्हणायचं.. आन् आता तर रोज रात्तिच्याला यांचं रंगढंग बघुनशान संमदीजन पिंटकरावच म्हंत्याती.
डॉक्टर : (स्टेथोस्कोपनं पेशंट तपासत) पण यांना नेमकं झालंय तरी काय ?
बायजाबाई : मलाबी त्येच समजानंसं बगा. लई ऽऽ इचित्र वागू लागल्याती. कुणीबी नवीन माणूस दिसला की, लगीचंच त्वांड भरूनशान हसत्याती...आन् त्यास्नी हात जोडूनशान नमस्कारबी करत्याती. कवा-कवा तर डायरेक्ट समोरच्याचे पायबी धरत्याती.
डॉक्टर : (गोंधळून) मग शक्यतो बाहेर जाऊ देऊच नका ना यांना.
बायजाबाई : आता काय सांगू तुमास्नी? घरामंदी असतानाबी हात जोडूनशानच झोपत्याती. ‘म्या घरातलं शौचालय वापरतूया,’ आसं संमद्या पोरां-बाळांकडनं धा-धांदा लिहून घेत्याती.
डॉक्टर : (डोळे विस्फारून) असं कधीपासून होऊ लागलंय यांना?
बायजाबाई : गेल्या येक म्हैन्यापास्नं बगा.
डॉक्टर : माय गॉड... हा तर भलताच रोग दिसतोय.
बायजाबाई : व्हय.. व्हय.. लगीन झाल्यापास्नं बगते म्या. माजं काय चुकलं नाय तरीबी मला उगंचंच चिडचिड करायचे. शिव्या घालायचे, पण काल ह्यांच्या ताटामंदी माझ्याकडनं चुकुनशान कारल्याची भाजी ठिवली गेली, तरीबी ह्ये मला उलटं लाडानं म्हणत्यातीे, ‘बायजू.. तुज्या हाताची चवच लै भारी बग.’ परवा रात्तीच्याला न्हेमीपरमानं म्या त्यांची बाटली समोर ठिवली, तवा ती बाजूला सारूनशान म्हंत्यात, ‘आता नगं. इमेज ब्य्रांडिंग लई महत्त्वाचं असतंया.’
डॉक्टर : (डोकं खाजवत) अजून काय-काय होतंय त्यांना?
बायजाबाई : काल काय बोलले हुते, त्ये त्यांना आज आठवत नाय. गेल्या म्हैन्यात मला ओनलाइन का फिनलाइनवरनं साडी घिऊनशान देणार हुते. म्या त्यास्नी आज त्याची आठवण करूनशान दिली, तवा मलाच उलटं विचारत्याती, ‘म्या म्हणालू हुतो आसं? मला तर काय आठवत नाय, पण हरकत नाय, १६ नायतर २१ तारखेला तुला यकदम मॉल मंदनंच झ्याक साडी घिऊन टाकू.’
डॉक्टर : (चुटकी वाजवत) अरेऽऽ. गॉट ईट... नेमका रोग सापडला. याला तर आमच्या ‘मेडिकल लाइन’मध्ये ‘इएफ’ प्रॉब्लेम म्हणतात.
बायजाबाई : (तोंडाला पदर लावत ) अगो बया.. ह्यो कोन्चा रोग म्हनायचा?
डॉक्टर : ‘इएफ’ म्हणजे ‘इलेक्शन फिवर’! ‘गोड बोलणं, हात जोडणं, मागचं सारं विसरून जाणं अन् प्रत्येकाला नवनवीन आश्वासनं देणं!’ ही सारी लक्षणं या रोगात आढळतात.
बायजाबाई : (घाबरून) पण या रोगावरती काय उपाय नाय का डाक्टर?
डॉक्टर : आहे की... निवडणुका संपल्या की, ते आपोआप पुन्हा नॉर्मल होतील. पूर्वीसारखंच पुन्हा तुमच्यावर गुरगुरू लागतील. ज्या लोकांचे ते आज पाया पडताहेत, त्यांच्याकडे नंतर ढुंकूनही पाहणार नाहीत.
- सचिन जवळकोटे