विरोधकांनी केले भजन

By admin | Published: July 16, 2015 02:18 AM2015-07-16T02:18:26+5:302015-07-16T02:18:26+5:30

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करीत विधानसभेत प्रचंड गदारोळ घातला.

Hymns made by opponents | विरोधकांनी केले भजन

विरोधकांनी केले भजन

Next

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करीत विधानसभेत प्रचंड गदारोळ घातला. दोनवेळा सभागृह तहकूब झाले. दोन्ही बाजूंचे सदस्य वेलमध्ये उतरले. गळ्यात टाळ अडकवून विरोधक भजन म्हणत अवघ्या विधान भवनात फिरले. पायऱ्यांवर बसले. माध्यमांना हे सगळे कव्हर करण्यासाठी विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर विरोधक विधिमंडळाच्या मार्गातील रस्त्यावर ठिय्या मारून बसले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सरकार भूमिका स्पष्ट करत नाही म्हणत विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधक घोषणाबाजी करत वेलमध्ये उतरले. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी गिरणी कामगारांना घरे देण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करत या विषयावर कामगारांना मोर्चा काढावा लागतो हे दुर्दैव असल्याचे सांगितले. त्यावर राष्ट्रवादीचे सदस्य घोषणा देऊ लागले. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय काढला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य घोषणाबाजी करीत वेलमध्ये उतरले तसे भाजपा-शिवसेनेचे सदस्यही घोषणा देत वेलमध्ये उतरले. या गदारोळात दोनवेळा सभागृह तहकूब झाले. त्यानंतरही सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही हे पाहून विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला. त्यानंतर सगळे सदस्य काही वेळ विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले. सलग तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी कामकाजात सहभाग घेतला नाही.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. उद्या येतील. आज आपण चर्चा करू, सरकारची भूमिका ते उद्या मांडतील, असे वारंवार महसूलमंत्री एकनाथ खडसे सांगत होते; मात्र विरोधक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. कर्जमाफी देणार नाही असे मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी कसे काय बोलले? जर छापून आलेले खोटे असेल तर खुलासा का करत नाहीत? अशा मागण्या विरोधकांनी लावून धरल्या आहेत.

भजनसंध्या... सरकारविरोधात घोषणाबाजी करत विरोधीपक्षाच्या नेत्यांनी विधान भवन परिसरात भजन रंगवले. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव, छगन भुजबळ तसेच जयदत्त क्षीरसागर, विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड आणि डी.पी. सावंत आदी नेते उपस्थित होते. इनसेटमध्ये अजित पवार.

Web Title: Hymns made by opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.