मी छोटी नव्हे, मोठी आव्हाने स्वीकारतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 10:00 AM2023-02-08T10:00:28+5:302023-02-08T10:02:09+5:30
वरळी कोळीवाड्यातील काेळीबांधवांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी काेळीबांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियमांत बदल करावा लागला तरी करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
मुंबई : मी छोटी नव्हे तर फक्त मोठी आव्हाने स्वीकारतो. आव्हाने स्वीकारतच मी इथपर्यंत आलो आहे. सहा महिन्यांपूर्वी मी असेच एक आव्हान स्वीकारले आणि सर्वसामान्यांचे सरकार स्थापन केले. तेव्हा जे बोलतात त्यांना बोलू द्यात, माझे कामच बोलेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेना (ठाकरे गट) नेते माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांना त्यांच्याच मतदारसंघात प्रत्युत्तर दिले.
वरळी कोळीवाड्यातील काेळीबांधवांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी काेळीबांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियमांत बदल करावा लागला तरी करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
वरळीच्या समुद्रातून जाणाऱ्या कोस्टल रोडच्या दोन पिलरमधील अंतर कोळीबांधवांच्या मागणीनुसार ६० मीटरवरून १२० मीटर करण्यात आले. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल कोळीबांधवांनी मुख्यमंत्र्यांचा हा जाहीर सत्कार केला. यावेळी वरळीतून निवडणूक लढवून दाखवा, या आदित्य यांच्या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. शिंदे म्हणाले, गुवाहाटीमध्ये असताना काही लोक म्हणाले, वरळीत येऊन दाखवा. हा एकनाथ शिंदे वरळीत एकटाच आला. हेलिकॉप्टरने न जाता वरळीतून रस्त्याने गेलाे. आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो आहोत. आम्हाला आयते मिळालेले नाही. आव्हाने पेलतच इथपर्यंत पोहोचलो आहोत. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लाेढा, आमदार आशीष शेलार, सदा सरवणकर, प्रवीण दरेकर, संजय शिरसाट, यामिनी जाधव, नीतेश राणे, प्रसाद लाड, यशवंत जाधव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले....
- कोळी समाज हा मुंबईचा पिलर आहे. त्यामुळे कोळीवाड्यांचे सीमांकन करणे, डिझेल परतावा यासह प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू.
- कोळीवाड्यातील गोल्फादेवी मंदिरासाठी निधी कमी पडू देणार नाही.
- रखडलेले पुनर्वसनाचे प्रकल्प पुन्हा सुरू करू.
- मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार.