मी वंशज, पण छगन भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार – खा. छत्रपती संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 08:31 PM2022-04-04T20:31:19+5:302022-04-04T20:31:52+5:30

मंत्री छगन भुजबळ हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांचे विचार तळागाळातील नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे असं संभाजीराजेंनी म्हटलं.

I am a descendant, but Chhagan Bhujbal is the true heir of Shahu Maharaj's thoughts. MP Chhatrapati Sambhaji Raje | मी वंशज, पण छगन भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार – खा. छत्रपती संभाजीराजे

मी वंशज, पण छगन भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार – खा. छत्रपती संभाजीराजे

Next

नाशिक - छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा देशात अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींना आरक्षण दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची निर्मिती करून आरक्षण दिले. छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केलं आहे. मी त्यांचा वंशज असून त्यांनी केलेलं काम पुढे अविरत सुरु ठेऊन बहुजन समाजाला एकत्र ठेवण्याचे माझे प्रयत्न आहे. मी जरी वंशज असलो तरी मंत्री छगन भुजबळ यांनी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालविला असून ते त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचं कौतुक खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.

खा.युवराज संभाजीराजे छत्रपती(Yuvraj Chhatrapati Sambhajiraje) यांनी नाशिक येथे आज भुजबळांची सदिच्छा भेट घेतली. संभाजीराजे म्हणाले की, नाशिक येथे झालेल्या मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनाच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ यांची भेट झाली होती. त्यावेळी घरी येणार असं मी त्यांना सांगितलं होतं. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून भेट झाली नाही. आज नाशिक येथे कार्यक्रमानिमित्त आलो असता त्यांची भेट घेतली. छत्रपती शाहू महाराज आणि नाशिकचा जुना संबंध आहे. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला त्यांनी मोठी मदत केली होती. तसेच पिंपळगाव बसवंत येथील सत्यशोधक चळवळीत काम करणारे सत्यशोधक गणपतराव मोरे यांना त्यांच्या कामाबद्दल अधिक बळ दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या ६ मे रोजी असलेल्या स्मृती शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दल आमची चर्चा झाली असून या निमित्ताने छत्रपती शाहू महाराज यांचे विचार जगभरात पोहचविण्यासाठी ही संधी असून त्यादृष्टीने आमच्याकडून संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येणार आहेत. या भेटीत बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांचे विचार तळागाळातील नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मराठा आणि ओबीसी हा कुठलाही वाद नाही बहुजन समाजासाठी आपला लढा आहे. फार थोडे लोक असा वाद करतात त्याला आपला विरोध आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी एकत्रित आल्यावर आपल्याला न्याय मिळणार आहे. त्यामुळे बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न असल्याचे संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार देशाला या दलदलीतून वाचवू शकतात - भुजबळ

सत्यशोधक समाजाच्या लोकांना शाहू महाराजांनी मोठ पाठबळ दिलं व मदत केली. समाजातील वंचित घटकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. त्यामुळे बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही एकमेकांना ताकद देणार असल्याचं छगन भुजबळांनी(Chhagan Bhujbal) स्पष्ट केले. ते म्हणाले की, मराठा ओबीसी असा कुठलाही वाद नसून ओबीसी आरक्षणास कुठल्याही लोकप्रतिनिधीने विरोध केलेला नाही. काही विघातक प्रवृत्ती केवळ निवडणुकीच्या वेळेस ओबीसी मराठा वाद पसरविण्याचा प्रयत्न करतात. त्याला जनता बळी पडणार नाही. सद्या देशभरात जे वातावरण आहे, त्याबद्दल वेगळं सांगायला नको असे सांगत फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार देशाला या दलदलीतून वाचवू शकतात असे भुजबळांनी यावेळी सांगितले.

Web Title: I am a descendant, but Chhagan Bhujbal is the true heir of Shahu Maharaj's thoughts. MP Chhatrapati Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.