मी नार्को टेस्टलाही तयार...; ललित पाटील प्रकरणी मंत्री दादा भुसेंचं थेट चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 03:32 PM2023-10-18T15:32:35+5:302023-10-18T15:33:23+5:30

कदाचित सुषमा अंधारेंना नेहमी प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं.

I am also ready for narco test...; Direct challenge of Minister Dada Bhuse in Lalit Patil drugs case | मी नार्को टेस्टलाही तयार...; ललित पाटील प्रकरणी मंत्री दादा भुसेंचं थेट चॅलेंज

मी नार्को टेस्टलाही तयार...; ललित पाटील प्रकरणी मंत्री दादा भुसेंचं थेट चॅलेंज

मुंबई – ललित पाटील प्रकरणी मागच्यावेळी सुषमा अंधारेंनी आरोप केल्यानंतर मी कुठल्याही चौकशीला तयार असल्याचे म्हटलं. अंधारेंना ज्याही चौकशीची मागणी असेल ती करावी. नार्को टेस्टही करावी. आंतरराष्ट्रीय पातळीवरील चौकशी असेल तीदेखील करा. असल्या आरोपांना मी भीक घालत नाही. आमचे उत्तरदायित्व जनतेशी, महाराष्ट्राशी आहे. चौकशीत सर्व गोष्टी समोर येतील. ड्रग्ज प्रकरण असो वा कुठल्याही प्रकरणात संबंध आला पदच नव्हे तर राजकारण सोडण्याची तयारी आहे असं थेट चॅलेंज मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.

मंत्री दादा भुसे म्हणाले की, केवळ प्रसिद्धीसाठी, बेछुट आरोप करायचे हे वारंवार बरे नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात कायद्याच्या चौकटीत उत्तर देऊ. या लोकांच्या मागे जे बोलविता धनी आहे त्याचा शोध घ्यावा लागेल. आरोप करणाऱ्यांची नार्को टेस्ट करावी. सुषमा अंधारे या महान कार्यकर्त्या आहेत. मी लहान आहे. जनतेत राहून शिवसैनिक काम करतो. अंधारे आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्या आहेत. महिला आहेत त्याचा सन्मान आहे. याचा अर्थ उचलली जीभ टाळूला लावायची असं नाही. ज्या यंत्रणेकडून चौकशी व्हावी वाटते त्याला सामोरे जायचे तयारी आहे हे मी आधीच सांगितले आहे असंही त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत कदाचित सुषमा अंधारेंना नेहमी प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे. ललित पाटील आता पोलिसांना सापडला आहे. चौकशीत सर्व गोष्टी समोर येतील. ड्रग्ज नाशिकमध्ये असो वा देशात, जगात कुठेही असू दे त्याचे समर्थन कोण करणार आहे. चौकशीत समोर आलेत, कदाचित इतर ठिकाणीही हे धंदे सुरू असतील. त्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी. जाणीवपूर्वक कुणी नाशिककरांचा अवमान करत असेल तर ते खपवून घेणार नाही असंही मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

१५ दिवसांपासून ललित पाटील फरार होते, पालकमंत्री दादा भुसे यांच्या कारकिर्दीत २००-३०० कोटींचा ड्रग्ज कारखाना उभा कसा राहतो? शंभुराज देसाई यांच्या काळात नाशिक, सोलापूरमध्ये कारखाने उभे राहिलेत. शंभुराज देसाई यांच्या सहमतीने हे सगळे होतेय का याची चौकशी व्हायला हवी. या सर्व गोष्टीची सखोल चौकशी करावी लागेल. ललित पाटीलला अटक केली मग फरार कुणी केले होते. पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळतो. तो साकीनाका पोलिसांना सापडतो. मुंबई पोलिसांना सापडतो, पुणे पोलिसांना का नाही. गुजरातमधून चेन्नईला गेल्यावर त्याला अटक झाली. ललित पाटीलचा जयसिंघानी होऊ नये. ससून रुग्णालयातील वॉर्ड नंबर १६ चे गौडबंगाल कळालेच पाहिजे अशी मागणी करत सुषमा अंधारे यांनी दादा भुसे, शंभुराज देसाईंवर आरोप केले.

Web Title: I am also ready for narco test...; Direct challenge of Minister Dada Bhuse in Lalit Patil drugs case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.