मी बाई भाजीवाली, फॉरेनची...

By Admin | Published: March 8, 2016 02:57 AM2016-03-08T02:57:46+5:302016-03-08T09:40:28+5:30

‘शेती’ शब्द ऐकला तरी बहुतांश तरुणांच्या कपाळावर आठी येते. नव्या सिंचन पद्धती, नवी पिके आणि निर्यात यांचे सूत्र जमवता आले तर शेतीमधूनही चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते.

I am a bai Bhajiwali, a foreign ki ... | मी बाई भाजीवाली, फॉरेनची...

मी बाई भाजीवाली, फॉरेनची...

googlenewsNext

ओंकार करंबेळकर,  मुंबई
‘शेती’ शब्द ऐकला तरी बहुतांश तरुणांच्या कपाळावर आठी येते. नव्या सिंचन पद्धती, नवी पिके आणि निर्यात यांचे सूत्र जमवता आले तर शेतीमधूनही चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते. हेच गणित जमवले सायली चुरीने आणि ‘निसर्ग अ‍ॅग्रो’ ही कंपनी स्थापन केली. ती परदेशी (एक्झॉटिक) भाज्या आणि फळांचे उत्पादन आणि विक्री करते.
सुरुवातीच्या काळात भारतातील हॉटेल्स किंवा मुंबई-गोव्याला येणाऱ्या क्रुझवर परदेशी भाज्यांना मागणी असे. त्यांना युरोपीय दर्जाची भाजी व फळे पुरवणे हे अवघड काम होते. हे आव्हान सायलीने आई-वडीलांच्या मदतीने स्वीकारले आणि पंचतारांकित हॉटेल्समधून त्यांच्या भाज्यांना मागणी वाढू लागली. ही हॉटेल्स रंग, वास, चवी आणि गुणधर्मांच्या नियमांचे पालन केले तरच माल स्वीकारतात. आपले उत्पादन त्या तोडीचे व्हावे यासाठी सायली प्रयत्न करत असते.
आजकाल भारतीयांचे परदेशात जाणे वाढले आहे. परदेशातील भाज्यांची, फळांची गुणवत्ता पाहिल्यानंतर त्यांना भारतातही तशाच गुणवत्तेची आणि सेंद्रिय उत्पादने हवी असतात. ही गरज ओळखून सायलीने व्यवसाय वाढीसाठी नवे प्रकल्प हाती घेतले. तर तिचे आई-वडील- मकरंद व अंजली यांनी संशोधनावर लक्ष केंद्रित केले. रंगीबेरंगी सिमला मिरच्या, अस्पॅरॅगस, ड्रॅगन फ्रूट, ब्रोकोली, विविध प्रकारच्या पालेभाज्या, परदेशी टोमॅटो, वांगी अशा भाज्यांना परदेशात पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू झाला. युरोपात माल पाठविण्यासाठी कडक अटी व प्रमाणांचे पालन करावे लागते. त्यात तिला यश मिळाले. गंमत म्हणजे भारतात तयार झालेल्या थायी भाज्यांची गुणवत्ता, त्यांचा रंग, वास थायलंडमधील मूळ भाज्यांपेक्षा चांगला असल्याचे मत इंग्लंडमधील लोकांनी नोंदविले.
आता भाज्या आणि फळांचे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) करून त्या अधिक काळ टिकाव्यात यासाठी सायली प्रयत्न करत आहे. मालदिवच्या रुक्ष वालुकामय
मृदेत पिके घेण्यासाठी सायली
आणि तिच्या आई-बाबांनी मदत केली आहे.
काहीतरी नवे करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध तिने घेतला. त्यांना शेतावर नेऊन प्रशिक्षण दिले. बंगळुरू, कोलकाता, उटी, पणजी, नैनितालची बाजारपेठ या नव्या शेतकऱ्यांना मिळाली. शेतीमध्येही स्टार्ट-अप्स आहेत हे सायलीने सिद्ध केले आहे.
पुन्हा शेताकडे चला
तरुणांनी शहरात येण्यापेक्षा गावातच शेतीचा विकास करता येतो का ते पाहणे गरजेचे आहे असे सायली सांगते. शेती हा सन्मानाचा व्यवसाय आहे. योग्य उत्पादने आणि पद्धत वापरल्यास शेतीत यश मिळवता येते, यावर तिचा ठाम विश्वास आहे.

Web Title: I am a bai Bhajiwali, a foreign ki ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.