मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; एक लढाई जिंकलो, पुढेही जिंकू : एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 10:14 AM2022-10-03T10:14:52+5:302022-10-03T10:15:53+5:30
आगामी निवडणुकांमधील युतीबाबत शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान यावेळी आता दोन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा रॅली होणार आहेत. यादरम्यान झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलीच खरी शिवसेना असल्याचा पुनरुच्चार केला. तसंच आमच्याकडे संख्या आहे आणि आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे लोक असल्याचंही ते म्हणाले.
"रॅलीची मी तयारी पाहून आलो आहे. मोठ्या उत्साहात ही तयारी सुरू आहे. हजारो लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी लोक येतील. त्यांना कोणतीही समस्या येऊ नको, ते सहजरित्या येऊन जावेत यासाठी काम केलं जात आहे. ही रॅली यशस्वी ठरणार आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले. एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी निरनिराळ्या विषयांवर भाष्य केलं.
मैदान कोणतंही असो विचार महत्त्वाचे आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहोत. यासाठी आम्हाला लोकांचं समर्थन मिळत आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जातो, तेथील लोकांच्या भावना पाहून कल्पना येते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
... म्हणून लोक जोडली जातायत
"आम्ही काम करणारे लोक आहोत. लोक नक्की येणार. ही काम करणारी माणसं आहेत आणि जे विचार हे मांडतात तेच हे करतात याची लोकांना कल्पना आहे. जी आपली व्यक्ती आहे, त्यासाठी आम्ही काम करत आहोत," असंही शिंदे म्हणाले.
"लोकशाहीत बहुमताला महत्त्व"
लोकशाहीमध्ये संविधान, कायदा असतो. त्यानुसारच गोष्टी होत असतात. बहुमतालाही महत्त्व आहे. आमच्याकडे ५५ पैकी ४० आमदार आहेत. १० अपक्ष आमदार आहे. अपक्ष आमदारांनी साथ सोडली तरी ५५ पैकी ४० आमदार आमच्यासोबत आहेत. १८ पैकी १२ खासदार आमच्याकडे आहेत. देशातील ४० राज्यांचे प्रमुख आमच्यासोबत आहेत. लाखो लोक आमच्यासोबत आहोत. स्पष्ट बहुमत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पालिकेत युती
मुंबई महानगरपालिकेची निवडणूल भाजपसोबत एकत्रच लढणार आहोत. आमची नैसर्गिक युती आहे. शिवसेना भाजपचं सरकार राज्यात काम करत आहे. येत्या निवडणुकांमध्येही एकत्रच लढणार असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.