"धनंजय मुंडेची मी पहिली बायको...", करुणा मुंडेंचा दावा; वकील म्हणाले, 'कागदपत्रं खोटी'! कोर्टात काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 15:03 IST2025-04-05T13:50:42+5:302025-04-05T15:03:27+5:30
आजच्या सुनावणीत करूणा मुंडे यांच्याकडून मुलांचे पासपोर्ट, जन्माचे प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज यासारखी विविध कागदपत्रे सादर करत बायको असल्याचा दावा करणारी कागदपत्रे कोर्टात सादर केली

"धनंजय मुंडेची मी पहिली बायको...", करुणा मुंडेंचा दावा; वकील म्हणाले, 'कागदपत्रं खोटी'! कोर्टात काय घडलं?
मुंबई - धनंजय मुंडे आणि करूणा मुंडे वादाबाबत आज कोर्टात सुनावणी घेण्यात आली. त्यात दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. करूणा मुंडे यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी आहेत असा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात केला तर मी धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे. त्याबाबतचे पुरावे सादर केलेत असं करूणा मुंडे यांनी सुनावणीनंतर माध्यमांना सांगितले. कोर्टानं आज दोन्ही बाजू ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा पुढील २-३ दिवसांत कोर्ट निकाल देईल असं वकिलांकडून सांगण्यात आले आहे.
कोर्टात काय घडलं?
मागील सुनावणीत कोर्टाकडून करूणा मुंडे यांना कागदपत्रे सादर करण्यात सांगण्यात आले होते. मात्र लग्नाबाबत कुठलीही कागदपत्रे त्यांनी सादर केली नाहीत असं धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी सांगितले. त्याशिवाय करूणा मुंडे यांनी सादर केलेली कागदपत्रेही धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडून नाकारण्यात आली. दुसरीकडे २७ वर्ष आम्ही एकत्र राहिलो आहे. माझ्या वकिलांपेक्षा मला युक्तिवाद करण्याची परवानगी कोर्टाने द्यावी असं करूणा मुंडे यांनी म्हटलं. परंतु कोर्टाने त्यास नकार दिला. वकिलांना बोलू द्या, योग्य ते ऐकून आम्ही निर्णय देऊ असं कोर्टाने म्हटलं.
तसेच आजच्या सुनावणीत करूणा मुंडे यांच्याकडून मुलांचे पासपोर्ट, जन्माचे प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज यासारखी विविध कागदपत्रे सादर करत बायको असल्याचा दावा करणारी कागदपत्रे कोर्टात सादर केली. माझ्या बाजूने १०० टक्के निकाल लागेल. मी इतके पुरावे सादर केले त्यामुळे धनंजय मुंडेंचे वकील कोर्टात गोंधळलेले होते. मी १९९६ पासून धनंजय मुंडे यांची बायको आहे. आज कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यात आम्ही पुरावे सादर केले आहेत. मी धनंजय मुंडे यांची पहिली बायको आहे हे कोर्टात सांगितले आहे असं करूणा मुंडे यांनी म्हटलं.
नेमकं प्रकरण काय?
वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने करूणा मुंडे यांना दर महिना २ लाख रूपये पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले होते. या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावर आज सत्र न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.