चंद्रकांत पाटलांना मी हिमालयात सोडायला जातो, जयंत पाटील यांचा उपराेधिक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 07:00 AM2022-04-18T07:00:09+5:302022-04-18T07:01:32+5:30
येथे पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आतापर्यंत राज्यातील २३० विधानसभा मतदारसंघांतून आली आहे.
सातारा : भाजपचे नेते बोलतात तसे वागत नाहीत. चंद्रकांतदादा तर भाजपचे सोयीचे अध्यक्ष वाटतात. कोल्हापुरातील निवडणुकीवरून हिमालयात जाणार, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे हिमालयात ते जाणार असतील तर इथंही उकाडा आहे. त्यामुळे त्यांना सोडायला मी जातो, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. यावेळी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर त्यांनी नकलाकाराकडून काय अपेक्षा करणार, असा प्रहारही केला.
येथे पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आतापर्यंत राज्यातील २३० विधानसभा मतदारसंघांतून आली आहे. २३ एप्रिलला कोल्हापुरात या यात्रेचा समारोप होत आहे. राज्यात या यात्रेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरीही यामधून बरीच सुधारणा करावी लागेल, असेही दिसून आले आहे.
राज्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आरोप आणि अल्टिमेटम देणे सुरू आहे, तसेच त्यांनी आपल्यावरही टीका केली होती, याबाबत आपली भूमिका काय? या प्रश्नावर ते म्हणाले, राज ठाकरे सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. ते कोणाच्या तरी हातचे बाहुले झाले आहेत, हे आता सर्वांना माहीत झाले आहे. अशा नकलाकारांच्या कलेचं कौतुकच केलं पाहिजे. भोंगे बंद करण्याचा विषय ते मांडतात. यापेक्षा त्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेशमध्ये जावे. त्या ठिकाणी भोंगे बंद झाले का, हे तपासावे. त्याप्रमाणे आम्हालाही सांगावे.