मी काँग्रेस सोडतोय ही निव्वळ अफवा - नारायण राणे
By admin | Published: March 23, 2017 09:49 AM2017-03-23T09:49:45+5:302017-03-23T11:14:11+5:30
मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ पक्षांतर करतो असा होत नाही. काँग्रेसमधल्याच काही लोकांनी माझ्या पक्षांतराची बातमी पसरवली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ पक्षांतर करतो असा होत नाही. काँग्रेसमधल्याच काही लोकांनी माझ्या पक्षांतराची बातमी पसरवली आहे. मी काँग्रेसमध्येच आहे. पक्षांतर करतोय ही निव्वळ अफवा असे सांगत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्यांचे खंडन केले. काँग्रेसमध्ये न्याय मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मला आणि माझ्या कुटुंबाला डावलल जातेय असा आरोप त्यांनी केला.
मागच्या काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे शिवसेना-भाजपाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. नारायणे राणेंची काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याने ते पक्ष बदल करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.
अलीकडेच नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश राणे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका करत काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. नारायण राणेंना शिवसेनेत प्रवेश द्यायचा की, नाही यावर शिवसेनेत मंथन सुरु असल्याचे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले होते. 2004 मध्ये नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला अनेक धक्के दिले होते.
उद्धव ठाकरेंवर अत्यंत बोच-या शब्दात टीका केली होती. त्यामुळे राणेंना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यासंबंधी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. कोकणात राणेंशी पंगा घेऊन शिवसेना वाढवणा-या नेत्यांचाही शिवसेनेला विचार करावा लागणार आहे तसेच कोकणात आता शिवसेनेने आपला गमावलेला जनाधार पुन्हा भक्कम केला आहे त्यामुळे राणेंची उपयुक्तता किती राहील यावर मंथन सुरु आहे.
भाजपाही नारायण राणेंबद्दल अनुकूल आहे. कोकणात भाजपालाही राणेंसारखा भक्कम नेता हवा आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नावरुन परत येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी एकत्र प्रवास केला होता याकडेही राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे. नारायण राणेंनी मागच्या दोन एक वर्षात सातत्याने काँग्रेसवर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. स्वत: नारायण राणेंनी आपण काँग्रेसमध्येच आहोत. शिवसेना किंवा भाजपाच्या कुठल्याही नेत्याला भेटलो नसल्याचे सांगितले आहे.