‘मी मराठी मुसलमान’ अभियान; शिवसैनिकाचा अनोखा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 05:45 AM2018-10-15T05:45:35+5:302018-10-15T05:45:50+5:30

देशभरात गायीच्या नावाखाली झुंडशाही सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच त्याविरोधात आवाज उठविला होता. त्यामुळे देशात बदल घडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मराठी मुस्लिमांना एकत्र करण्याचे अभियान बीड येथील एका शिवसैनिकाने सुरू केले आहे.

'I am a Marathi Muslim' campaign from Shivsainik | ‘मी मराठी मुसलमान’ अभियान; शिवसैनिकाचा अनोखा निर्धार

‘मी मराठी मुसलमान’ अभियान; शिवसैनिकाचा अनोखा निर्धार

Next

मुंबई : एकीकडे शिवसेना नेते राम मंदिराचा मुद्दा पेटविण्यासाठी उत्तर प्रदेशची धूळ झाडत असताना महाराष्ट्रातील एका मुस्लीम शिवसैनिकाने ‘मी मराठी मुसलमान, माझ्या हाती भगवा’ असे अनोखे अभियान राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. देशभरात गायीच्या नावाखाली झुंडशाही सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच त्याविरोधात आवाज उठविला होता. त्यामुळे देशात बदल घडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मराठी मुस्लिमांना एकत्र करण्याचे अभियान बीड येथील एका शिवसैनिकाने सुरू केले आहे.


बीड येथील परळी-वैजनाथ तालुक्यातील शिरसाड या गावातील नसीब शेख शिवसैनिकाच्या अभियानाची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठी मुस्लिमांना शिवसेनेसोबत येण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ शेख यांनी टाकला असून या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. देशातील मुख्य राजकीय पक्षांनी आजवर मुस्लिमांचा व्होटबँक म्हणून वापर केला. मुस्लीम कार्यकर्ते केवळ सतरंजी उचलण्यापुरते राहिले. त्यांच्यातून राजकीय नेतृत्व पुढे येऊ दिले गेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी मुुस्लिमांनी आता शिवसेनेला साथ द्यावी, असे आवाहन नसीब शेख यांनी केले आहे. मोदींच्या काळात देशभर झुंडशाही व गायीच्या नावाखाली मुस्लिमांच्या हत्येच्या घटना घडल्या. तेव्हा गायीच्या नावाखाली माणसे मारणारे हिंदुत्व अमान्य असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यामुळे शिवसेनेसोबत राहण्यातच मुस्लिमांचे हित असल्याचे शेख यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.


प्रमुख राजकीय पक्षांनी फसवणूक केल्याची जाणीव मुस्लीम समाजालाही होत आहे. त्यामुळे बहुसंख्य मुस्लीम मतदार असलेल्या शिरसाड या ग्रामपंचायतीत शिवसेनेचा सरपंच निवडून आला. भाजपा आणि राष्ट्रवादीचा गड असणाऱ्या गावातील हा बदल समाजातील बदल दाखवून देणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी मुस्लिमांनी शिवसेनेसोबत यावे, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. या मेळाव्यानंतर ‘मी मराठी मुसलमान, माझ्या हाती भगवा’ या नावाने राज्यभर अभियान राबविणार असल्याचेही शेख यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

मते वळविण्याचा प्रयत्न
भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांची एमआयएमसोबतची युती भाजपाच्या पथ्यावर पडण्याची भीती काँग्रेस, राष्ट्रवादीने व्यक्त केली होती. शिवसेनेने तर या युतीची भाजपाची बी टीम अशी संभावना केली होती.
एमआयएम आणि आंबेडकरांच्या या युतीच्या पार्श्वभूमीवर ‘मी मराठी मुसलमान’ मोहिमेतून मुस्लीम मते वळविण्याचा शिवसेना प्रयत्न करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: 'I am a Marathi Muslim' campaign from Shivsainik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.