मी पळणारा नाही, लढणारा आहे; फडणवीसांनी रणशिंग फुंकलं: अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीवरही बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 04:10 PM2024-06-08T16:10:00+5:302024-06-08T16:15:12+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची रणनीती कशी असली पाहिजे, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे.

I am not a runner I am a fighter says devendra Fadnavis also talked about the meeting with Amit Shah | मी पळणारा नाही, लढणारा आहे; फडणवीसांनी रणशिंग फुंकलं: अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीवरही बोलले!

मी पळणारा नाही, लढणारा आहे; फडणवीसांनी रणशिंग फुंकलं: अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीवरही बोलले!

BJP Devendra Fadnavis ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पीछेहाटीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विधीमंडळ सदस्यांची मुंबईतील दादर इथं बैठक पार पडली. यावेळी आमदारांना संबोधित करताना भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजीनाम्याच्या इच्छेबाबतची सविस्तर भूमिका स्पष्ट केली. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची रणनीती कशी असली पाहिजे, याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे. सरकारमधील जबाबदारीतून मोकळं होण्याचा मी जो विचार करत होतो, तो पक्षवाढीसाठी काम करण्यासाठी होता. मी ते निराशेतून बोललो नव्हतो, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

सरकारमधील जबाबदारीपासून मुक्त होण्याच्या विचाराबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि मुंबई अध्यक्षांसह पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत अतिशय उत्तम काम केलं. मात्र आपण फक्त राजकीय अरिथमेटिकमध्ये कमी पडलो.  देवेंद्र फडणवीस हा पळणारा नाही, लढणारा आहे. मी उपमुख्यमंत्रिपदावरून दूर झालो असतो तरी एकही दिवस घरी बसणार नव्हतो. चारहीकडून घेरले गेल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पूर्ण ताकदीने मैदानात उतरून सगळे किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपली प्रेरणा आहेत. माझ्या डोक्यात काही रणनीती होती, आजही आहे. आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी काल अमितभाई शाह यांनी भेटलो. त्यांचीही भूमिका तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती. मात्र ते मला म्हणाले की, थोडे दिवस जाऊद्या. आता जे काम सुरू आहे ते सुरू ठेवा आणि त्यानंतर आपण बसून महाराष्ट्राबाबतची ब्ल्यू प्रिंट ठरवू," असा संदेश अमित शाह यांनी दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, "महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांची टक्केवारी ४३.९ इतकी आहे, तर आपल्यालाही ४३.६ टक्के मतं मिळाली आहेत. फक्त राजकीय गणितामुळे आपल्याला अपयश आलं, मात्र भविष्यात हे चित्र आपण बदलवू शकतो," असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

तीन महत्त्वाच्या नेत्यांची दिल्लीत खलबतं
 
राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांच्या उपस्थितीत काही वेळापूर्वी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली़. या निवडणुकीत आपल्याला नेमक्या कोणत्या मुद्द्यांमुळे फटका बसला, यावर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांकडून मंथन केले गेले.  राज्यात पुन्हा ताकद निर्माण करून महायुतीला भरारी घेण्यासाठी काय रणनीती आखावी लागेल, यावरही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चर्चा केली गेल्याचं सांगितलं जात आहे.
 

Web Title: I am not a runner I am a fighter says devendra Fadnavis also talked about the meeting with Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.