मी हिंदू धर्माच्या विरोधात नाही - तृप्ती देसाई
By Admin | Published: February 13, 2016 02:37 AM2016-02-13T02:37:16+5:302016-02-13T02:37:16+5:30
आम्ही सगळेच आस्तिक आहोत. हिंदू धर्माच्या बिलकूल विरोधात नसून, धर्माचा आदरच करतो. चारशे वर्षांपूर्वीच्या प्रथा, परंपरामधील काही अनिष्ट रुढी बंद करायला हव्यात, एवढेच
- धनाजी कांबळे, पुणे
आम्ही सगळेच आस्तिक आहोत. हिंदू धर्माच्या बिलकूल विरोधात नसून, धर्माचा आदरच करतो. चारशे वर्षांपूर्वीच्या प्रथा, परंपरामधील काही अनिष्ट रुढी बंद करायला हव्यात, एवढेच आमचे म्हणणे आहे. राज्य घटनेने सगळ्यांनाच उपासनेचा हक्क आणि अधिकार दिला असताना, देवाच्या दर्शनासाठी लिंगभेद करता कामा नये. महिलांनी गुलामगिरी झुगारून आज एकविसाव्या शतकात पुरुषांच्या बरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे, असे असताना त्यांना पुन्हा एकदा धर्मवादाचे राजकारण करून गुलामगिरीत ढकलणे अमानवी वाटल्यानेच मला हे आंदोलन महत्त्वाचे वाटते,’’ असे भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
देसाई म्हणाल्या,‘‘ मासिक धर्माच्या वेळी बाई अपवित्र होते, तर पुरुषी मानसिकता असलेल्या समाजातील कुटुंबांना या काळातील बाईचा पगार कसा चालतो? कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या काही संस्था, संघटना आमच्या भूमिकेला विरोध करीत असल्या, तरी त्यांच्यातीलच काही गट त्यांच्या परिषदांसाठी आम्हाला निमंत्रण देऊन आमच्या भूमिकेला पाठिंबा देतात. मुख्यमंत्र्यांकडे आमचा पाठपुरावा सुरू असून, त्यांनी महिलांना अधिकार मिळायलाच हवा, अशी सकारात्मक भूमिका आमच्यासोबत बोलून दाखविली आहे. ते याबाबत योग्य निर्णय घेतील, अशी आम्हाला आशा आहे’’ (प्रतिनिधी)