मी नाही, अजित पवारांनीच स्वतःला दिली क्लीन चिट - पृथ्वीराज चव्हाण
By admin | Published: October 1, 2014 05:15 PM2014-10-01T17:15:12+5:302014-10-01T17:15:12+5:30
सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना मी क्लीन चिट दिलेली नसून ही क्लीन चिट स्वयंघोषीत असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी क्लीन चिट दिलेली नसून ही क्लीन चिट स्वयंघोषीत असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. माधव चितळे समितीने अजित पवारांना क्लीन चिट दिली असती तर हायकोर्टाने पवार व सुनील तटकरे यांच्याविरोधात चौकशीचे आदेश का दिले असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीमध्ये अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. सिंचन घोटाळ्याविषयी प्रश्न विचारला असता चव्हाण म्हणाले, कायदा त्याचे काम करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना शिक्षा होणारच. कायदा व्यवस्थेत न्यायदान प्रक्रिया संथ असली तरी शेवटी न्याय मिळतो. जयललिता यांनाही १८ वर्षांनी शिक्षा झाली असे चव्हाण यांनी नमूद केले.
राष्ट्रवादीने पूर्वनियोजीतपद्धतीने सरकार पाडण्याचे काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची मागणी केली त्यावेळीच आघाडी तुटेल याचा अंदाज आला होता. राज्य भाजपच्या हवाली करुन राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात मंत्रिपद हवे होते असा आरोपही चव्हाण यांनी केला. राज्यात पुन्हा सत्ता आल्यास राज्यातून भ्रष्टाचाराला हद्दपार करु अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्राला स्वायत्तता द्या अशी मागणी करणा-या मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही चव्हाण यांनी निशाणा साधला. नेत्यांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असून देशाच्या विकासातही योगदान दिले पाहिजे असे चव्हाण यांनी म्हटले आहे.